पावसाची सरासरी अजूनही नीचांकीच!

नोकरीच्या शोधार्थ गाठताहेत शहरे : खरीप हातचा गेला; परतीच्या पावसाने हात दिला तर रब्बी शाश्‍वत

– बाळासाहेब वाबळे

काऱ्हाटी – बारामतीचा पश्‍चिम भाग हा वर्षानुवर्षे दुष्काळाची दाह सोसणारा परिसर म्हणून ओळखला जातो. याच भागातील लोणी भापकर मंडलातील माळवाडी, फोंडवाडा, कोरोळी, काऱ्हाटी, बाभुर्डी परिसरात सरासरी 330 ते 400 मिलीमीटर पाऊस कोसळतो. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून पाऊस 50 मिमीही कोसळलेला नाही. 2017-18 मध्ये 46, 18-19 मध्ये केवळ 20 मिमी पावसाची नोंद झाली असून तब्बल तीन वर्षांनंतर यंदा पाऊस शंभरी गाठेल असा अंदाज आहे. कारण यंदा आतापर्यंत 95 मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे परिसरात तीन वर्षांपासून आजतागायत टॅंकर धावत असून दिवसेंदिवस त्यात वाढ करण्याची मागणी केली जात असल्याने पिण्यासाठी थोडेफार मिळते मात्र, पिके आणि जनावरांचे हाल बघवत नसल्याने येथील अनेक शेतकऱ्यांनी शेतीसह दुग्ध व्यवसायाला “रामराम’ ठोकत नोकरीच्या शोधात शहरे गाठत आहेत. पण, ज्यांना जाणे शक्‍य नाही ते कसेबसे आपला उदरनिर्वाह करीत आहे.

राज्यात एकीकडे पावसाने हाहाकार केला, तर दुसरीकडे बारामती तालुक्‍यातील पश्‍चिम भागात वरुणराजाने पाठ फिरवली आहे. यंदा चांगल्या पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तवल्याने व सुरुवातीला बऱ्यापैकी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामाची पेरणी केली; मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. तब्बल दीड महिन्यांनंतर म्हणजेच जुलैच्या शेवट व ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला केवळ भुरभूर केल्याने आतापर्यंत 95 मिमीची नोंद झाली आहे. दरम्यान, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून उन्हाचा “चटका’ वाढल्याने पश्‍चिम भागातील खरीप हंगाम पूर्णत: वाया गेला आहे. दरम्यान, तालुक्‍यातील शाश्‍वत असा रब्बी हंगाम दमदार येण्यासाठी बळीराजा परतीच्या पावसाकडे डोळे लावून
बसला आहे.

होते नव्हते सगळे पैसे गेले, वरून कर्ज
बारामती तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात गेल्या तीन वर्षांपासून दोन्ही हंगामातील कोणतेही पीक हातात आलेले नाही. त्यात यंदा सुरुवातीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी 100 टक्‍के पेरण्या केल्या. या पेरणीसाठी त्याने स्वत:जवळ होते नव्हते तेवढा संपूर्ण पैसा शेतीच्या मशागतीसाठी वापरला व कर्ज काढून पेरणी केली. यात त्याने तूर, मका, बाजरीची प्रामुख्याने पेरणी केली त्यावेळी पावसाने दगा दिला नसल्याने पीक ही बऱ्यापैकी फुलोऱ्यात आले;मात्र बाजरी पोटऱ्यात येण्यास सुरुवात झाली त्यावेळी पावसाची गरज असताना पावसाने पाठ फिरवल्याने परिसरातील सर्व उभी पिके जळण्याच्या अवस्थेत पाहण्या शिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे काढलेले कर्ज आता कसे फेडायचे अन्‌ रब्बी हंगाम कसा घेणार, या विंवचनेने त्याला ग्रासले आहे.

…तोपर्यंत छावण्या, टॅंकर सुरू
बारामतीच्या पश्‍चिम भागातील चारा छावण्यांची मुदतवाढ ही सोमवार (दि. 30) पर्यंत करण्यात आलेली आहे. जोपर्यंत चांगला पाऊस येत नाही तोपर्यंत चारा छावण्या व टॅंकर असेच सुरू राहतील व मागणीनुसार टॅंकरही वाढविले जातील, अशी माहिती सुपाचे मंडल अधिकारी राहुल जगताप व लोणी भापकरचे मंडल अधिकारी धनसिंग कोरपड यांनी सांगितले.

“त्या’ भरलेल्या 11 बंधाऱ्यात पुन्हा खडखडाट
दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेले नाझरे धरणात गेल्या तीन वर्षांपासून केवळ “मृतसाठा’ (डेडस्टॉक) होता; परंतु यंदा वरील धरणांची पातळी पूर्ण झाल्याने उचल पाण्यावर नाझरे धरण 100 टक्‍के भरले. दरम्यान, या धरणावर प्रादेशिक योजनेतील 47 गावांना पिण्यासाठी याचा फायदा होतो; तर काही गावांना यातून आवर्तने सोडली जातात. यंदा धरण 100 टक्‍के भरल्याने तब्बल तीन वर्षांनंतर कऱ्हा नदीच्या कोरड्या पात्रात पाणी खळखळले त्यामुळे नदीवरील 11 बंधारे भरले गेले मात्र, जमिनीतील तीन वर्षांपासूनची असलेली धग पाहता भरलेल्या बंधाऱ्यातून पाणी तातडीने झिरपून गेल्याने केवळ महिन्याभरात या बंधाऱ्यांमध्ये पुन्हा “खडखडाट’ झाल्याने यंदाही भीषण दुष्काळ या परिसरातील नागरिकांसमोर उभा ठाकला आहे.

दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक फीमध्ये सवलत देऊन सहकार्याची भूमिका घ्यावी सर्वच पक्षाचे पुढारी निवडणूक काळात येतात व कोणत्यातरी योजनेतून पाणी आणण्याचे आश्‍वासन देतात व परत फिरकतच नाहीत गेले चार पिढ्यांपासून अशा प्रकारच्या आश्‍वासनांना येथील शेतकरी कंटाळा आहे.
– श्‍याम पवार, काऱ्हाटी


काऱ्हाटी (ता.बारामती) परिसरातील मेंढपाळांवर आले हलाखीचे दिवस. तुरळक पडलेल्या पावसामुळे गवत आले; मात्र आजही पाण्याची टंचाई कायम आहे. जनावरांसाठी छावण्या झाल्या; मात्र शेळी, बकरी, मेंढ्यांचे पालन करणाऱ्याने काय करायचे? मी परिसरामध्ये 40 वर्षांपासून मेंढ्या पाळत असून असे दिवस कधीच आले नाहीत. सलग तीन वर्षांपासून पाऊस पडला नसल्याने विहीर, बोरवेल कोरडेठाक पडले आहे. त्यामुळे पाणी विकत घेण्याशिवाय पर्यायच उरला नाही; मात्र नवरात्रीपर्यंत जर पाऊस पडला नाही, तर गाव सोडून जाण्याशिवाय पर्याय उरणार नाही.
– नामदेव तांबे, मेंढपाळ

Leave A Reply

Your email address will not be published.