Dhananjay Munde : धनंजय मुंडेंची आमदारकी धोक्यात? ‘जगमित्र’ कार्यालयातूनच मागितली आवादा कंपनीची खंडणी

बीड : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असलेल्या वाल्मिक कराडमुळे माजी मंत्री धनंजय मुंडे चांगलेच अडचणीत आले आहेत. देशमुख हत्या प्रकरणी 1400 पानांची चार्जशीट सीआयडीने दाखल केली आहे. या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक खुलासे उघडकीस येत आहेत.
३ महिन्यांच्या मीडिया ट्रायल अन् सीआयडीच्या चार्जशीटमध्ये वाल्मिक कराडच मुख्य सूत्रधार असल्याचा ठपका बसताच धनंजय मुंडेंनी आपल्या अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांना सहआरोपी करण्याची मागणी होत आहे. अशातच आता धनंजय मुंडेंची आमदारकीही धोक्यात आल्याचे दिसत आहे.
सरपंच संतोष देशमुख यांची हत्या खंडणीच्या प्रकरणातूनच झाल्याचा मोठा आरोप सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून केला आहे. वाल्मिक कराडने आवादा कंपनीला खंडणी मागितली आणि त्याला विरोध केल्यानेच देशमुख यांची हत्या केल्याचे या चार्जशीटमध्ये म्हटले आहे. अशातच आता ही खंडणी कुठून मागण्यात आली, याबाबतचा मोठा पुरावा देखील समोर आला आहे.
वाल्मिक कराडने धनंजय मुंडे यांच्या जगमित्र कार्यालयामधूनच आवादा कंपनीला खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या जबाबातून हे स्पष्ट करण्यात आले आहे. 8 ऑक्टोबर रोजी वाल्मिक कराडने जगमित्र कार्यालयामधून आवादा कंपनीकडे दोन कोटींची खंडणी मागितल्याचे यामध्ये म्हटले आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांनाही सहआरोपी करा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
धनंजय मुंडेंच्या जगमित्र कार्यालयातून मागितली खंडणी
वाल्मिक कराडने मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या गावात असलेल्या आवादा पवनचक्की प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदे यांना दोन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती आणि खंडणी ही परळी येथील जगमित्र कार्यालयामध्ये बसूनच मागितल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष म्हणजे आवादा पवनचक्की प्रकल्पाचे प्रोजेक्ट मॅनेजर सुनील शिंदे यांना एकदा याच जगमित्र कार्यालयातही बोलवण्यात आले होते. त्या ठिकाणी सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांना बोलावून घेण्यात आले. त्याठिकाणी मॅनेजर यांना बोलावून घेऊन काम सुरळीत ठेवायचे असेल तर, खंडणीची मागणी पूर्ण करा अन्यथा काम बंद करा अशी धमकीदेखील देण्यात आली होती.
मुंडेंच्या सातपुडा बंगल्यावरही खंडणीची बैठक
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयामधूनच खंडणीची मागणी झाल्याचे समोर आल्यानंतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. धनंजय मुंडे यांनाही संतोष देशमुखांच्या हत्येत सहआरोपी करा, अशी मागणी होत आहे. पहिल्यापासून धनंजय मुंडे हे या प्रकरणात आरोपी आहेत, असे आम्ही म्हणत आहोत. जगमित्र कार्यालयासह मुंडेंच्या सातपुडा या बंगल्यावरही खंडणीची बैठक झाल्याचा दावा सुरेश धस यांनी केला आहे.





