Auto Rickshaw: ओला-उबरला मोठा धक्का! १५ ऑगस्टपासून मेट्रो स्टेशनवर मीटरने धावणार रिक्षा
Auto Rickshaw: अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांच्या बैठकीनंतर निर्णय; प्रवाशांचा विश्वास जिंकण्यासाठी आणि पारदर्शकता आणण्यासाठी पाऊल.

Auto Rickshaw – ओला, उबर आणि रॅपिडो यासारख्या अॅप-आधारित कंपन्यांच्या वाढत्या वर्चस्वाला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायतने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १५ ऑगस्टपासून पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवडमधील पीसीएमसी मेट्रो स्थानके आणि परिसरातील अधिकृत रिक्षा स्टँडवर मीटरप्रमाणे रिक्षा सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थापक अध्यक्ष डॉ. बाबा कांबळे यांनी केली.
अतिरिक्त पोलीस आयुक्त सारंग आव्हाड यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. बैठकीत शहरात मीटरने रिक्षा व्यवसायाला चालना देणे, प्रवाशांचा विश्वास वाढविणे आणि रिक्षाचालकांचे आर्थिक शोषण रोखण्याबाबत चर्चा झाली. प्रशासनाकडून आवश्यक कायदेशीर सहकार्याचे आश्वासनही देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
पिंपरी-चिंचवडमध्ये ५५ हजारांहून अधिक रिक्षाचालक-मालक असून अॅप-आधारित सेवांमुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे मीटरने रिक्षा चालविणे आणि ‘शेअर-ए-रिक्षा’ सेवा प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. बोगस रिक्षाचालकांवर नियंत्रण आणून प्रवाशांना पारदर्शक आणि विश्वासार्ह सेवा देण्याचे उद्दिष्ट असल्याचे शहराध्यक्ष विजय ढगारे पाटील यांनी सांगितले. यावेळी धनंजय कुदळे, रोहन जोगदंड, महेश शिंदे आणि देवाप्पा कांबळे उपस्थित होते.





