Pune District : बारामती काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी वीरधवल गाडे, तर तालुकाध्यक्षपदी वैभव बुरुंगले
Pune District : काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून या नियुक्त्या करण्यात आल्या असून, या तरुण व निष्ठावंत नेतृत्वामुळे बारामतीतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीचे नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

बारामती : बारामती तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाची पाळेमुळे अधिक घट्ट करण्यासाठी आणि संघटनात्मक बांधणीला नवी गती देण्यासाठी पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत. बारामती तालुका काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी वीरधवल गाडे आणि तालुकाध्यक्षपदी वैभव बुरुंगले यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून या नियुक्त्या करण्यात आल्या असून, या तरुण व निष्ठावंत नेतृत्वामुळे बारामतीतील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये कमालीचे नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘संघटन सुजन अभियाना’ अंतर्गत निरीक्षकांनी बारामती जिल्ह्याला भेट देऊन स्थानिक नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी सविस्तर चर्चा केली होती. ब्लॉक अध्यक्ष नियुक्ती संदर्भात निरीक्षकांनी प्रदेश कार्यालयाकडे दिलेल्या शिफारशी आणि अहवाल विचारात घेऊन प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या निवडींवर शिक्कामोर्तब केले आहे.
या निवडीनंतर बोलताना नवनियुक्त शहराध्यक्ष वीरधवल गाडे आणि तालुकाध्यक्ष वैभव बुरुंगले यांनी सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, “सध्या देशात आणि राज्यात भाजपचा भ्रष्टाचार पराकोटीला पोहोचला आहे. युवकांमध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये सरकारच्या धोरणांविषयी प्रचंड नाराजी आहे. भाजपचा हा खरा चेहरा आणि त्यांचा भ्रष्टाचार आम्ही बारामती तालुक्यातील घराघरामध्ये पोहोचवणार आहोत.”
पुढे बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, “देशात आज युवकांपासून सर्वसामान्यांपर्यंत आणि शेतकऱ्यांपासून ते देशाच्या महत्त्वाच्या मुद्द्यांपर्यंत सर्वच घटकांवर अन्याय होत आहे. हे सर्व ज्वलंत मुद्दे हाती घेऊन आम्ही रस्त्यावर उतरून लढणार आहोत आणि जनतेला न्याय मिळवून देणार आहोत. आगामी काळात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि बारामती तालुक्यात काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी आम्ही दोघेही रात्रीचा दिवस करू.”
या महत्त्वपूर्ण जबाबदारीबद्दल दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नेते आणि प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मार्गदर्शनाबद्दल व विश्वासाबाद्दल त्यांचे मनापासून आभार मानले. पक्षाने दिलेली ही जबाबदारी पूर्ण निष्ठेने पार पाडू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
तसेच, आगामी काळात प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली, आमदार विश्वजीत कदम, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष लहू निवंगुने युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पवार आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव आकाश मोरे व ज्येष्ठ नेते अशोक इंगुले यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती तालुक्यात पक्षाचे काम अधिक जोमाने पुढे नेणार असल्याचे गाडे व बुरुंगले यांनी संयुक्तपणे जाहीर केले.





