Austria Women Collapse : क्रिकेट विश्वात मोठा उलटफेर! ८५ धावांनी जिंकणाऱ्या संघाचा दुसऱ्याच दिवशी लाजिरवाणा पराभव; ३५ धावांत सर्व बाद
Austria Women Collapse : मोआरा व्लासी क्रिकेट मैदानावर झालेल्या या लढतीत ऑस्ट्रियाचा संपूर्ण संघ अवघ्या ३५ धावांत ऑलआऊट झाला.

Austria Women ALL Out For 35 Runs Against Turkey Women Continental Cup 2026 : क्रिकेटच्या मैदानावर कधी काय घडेल याचा नेम नसतो, याचाच प्रत्यय महिला कॉन्टिनेंटल कप २०२६ (Women’s Continental Cup 2026) स्पर्धेत आला आहे. एक दिवस आधी ग्वेर्नसीविरुद्ध तब्बल ८५ धावांनी दणदणीत विजय मिळवणाऱ्या ऑस्ट्रिया महिला संघाची तुर्कीविरुद्धच्या सामन्यात अक्षरशः दाणादाण उडाली. मोआरा व्लासी क्रिकेट मैदानावर झालेल्या या लढतीत ऑस्ट्रियाचा संपूर्ण संघ अवघ्या ३५ धावांत ऑलआऊट झाला. धक्कादायक बाब म्हणजे ऑस्ट्रियाच्या तब्बल ७ फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. तुर्कीने हे सोपे आव्हान ८ गडी आणि २७ चेंडू राखून सहज पूर्ण केले.
पहिल्या ३ षटकांत ३ धक्के; कर्णधारासह अव्वल फळी फ्लॉप –
तुर्कीची कर्णधार कुब्रा कनावरचीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तिच्या गोलंदाजांनी हा निर्णय सार्थ ठरवत पहिल्याच चेंडूपासून आक्रमक मारा केला. पहिल्या षटकात ऑस्ट्रियाची कर्णधार प्रिया साबू खाते न उघडता बाद झाली. दुसऱ्या षटकात आशी चोपला धावबाद झाली, तर तिसऱ्या षटकात हादिया सिद्दीकी बाद झाली. अवघ्या ३ षटकांत ३ फलंदाज शून्यावर बाद झाल्याने ऑस्ट्रिया संघ सुरुवातीलाच बॅकफूटवर फेकला गेला.
हाजर सेलिकचा भेदक मारा; एकाच षटकात ३ बळी घेत उडवला धुव्वा –
सलामीवीर कोमाती रेड्डी (८) आणि शीतल भारद्वाज यांनी २० धावांची भागीदारी करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला खरा; मात्र कर्णधार कुब्राने रेड्डीला बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर तुर्कीची गोलंदाज हाजर सेलिकने एकाच षटकात तीन धक्के देत ऑस्ट्रियाची मधली फळी उद्ध्वस्त केली. तिने वेरा पोग्लिच, प्रिथा गणेशन आणि अंजुमन हीरा या तिघींनाही शून्यावर बाद केले. सेलिकने अवघ्या दोन षटकांच्या स्पेलमध्ये ४ बळी टिपत ऑस्ट्रियाच्या फलंदाजीचा कणा मोडला.
८.१ षटकांत ३५ धावांत खेळ खल्लास; टी-२० मधील निचांकी धावसंख्या –
ऑस्ट्रियाचा संपूर्ण डाव अवघ्या ८.१ षटकांत ३५ धावांवर संपुष्टात आला. संघातील एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला नाही आणि कोमाती रेड्डीने केलेल्या ८ धावा हाच संघातील सर्वोच्च वैयक्तिक स्कोअर ठरला. ही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधील ऑस्ट्रियाची आतापर्यंतची सर्वात निचांकी धावसंख्या ठरली आहे. एका दिवसात शानदार विजयापासून ते अवघ्या ३५ धावांत गारद होण्यापर्यंत ऑस्ट्रियाच्या झालेल्या या घसरगुंडीची सध्या क्रिकेट विश्वात जोरदार चर्चा सुरू आहे.





