AUS vs ZIM : झिम्बाब्वेचा १८ वर्षांनंतर विश्वचषकात ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाला २३ धावांनी चारी मुंड्या केलं चित
AUS vs ZIM : १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर झिम्बाब्वेने विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला हरवण्याची किमया साधली आहे.

AUS vs ZIM Zimbabwe beat Australia by 23 runs in T20 World Cup टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्कादायक निकाल समोर आला आहे. दुबळ्या समजल्या जाणाऱ्या झिम्बाब्वेने जागतिक क्रिकेटमधील दिग्गज असलेल्या ऑस्ट्रेलियाचा २३ धावांनी पराभव करून इतिहास रचला आहे. १८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर झिम्बाब्वेने विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला हरवण्याची किमया साधली आहे. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाचा सुपर-८ मधील मार्ग आता कठीण झाला असून गट ‘ब’ मधील समीकरणे रंजक बनली आहेत.
ब्रायन बेनेटची नाबाद झुंज; झिम्बाब्वेचे आव्हानात्मक लक्ष्य
नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या झिम्बाब्वेने २० षटकांत १७० धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियासमोर ठेवले होते. सलामीवीर ब्रायन बेनेट या विजयाचा खरा शिल्पकार ठरला. त्याने ५६ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने नाबाद ६४ धावांची संयमी पण आक्रमक खेळी केली. मारुमानी (३५) आणि रायन बर्ल (३५) यांनी मोलाची साथ दिली, तर कर्णधार सिकंदर रझाने अंतिम टप्प्यात १३ चेंडूत २५ धावा कुटून संघाला सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली.
मुझरबानीच्या ‘स्पेल’ने ऑस्ट्रेलियन फलंदाजी कोलमडली –
प्रत्युत्तरात १७१ धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या २९ धावांत त्यांचे ४ प्रमुख फलंदाज तंबूत परतले होते. मुझरबानीने आपल्या वेगाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाचे ४ फलंदाज तंबूत धाडले. त्याला ब्रॅड इव्हान्सने उत्तम साथ देताना ३ विकेट्स घेतल्या.
⚡️ THAT WINNING FEELING ⚡️#AUSvsZIM #AUSvZIM #T20WorldCup2026 #T20WorldCup pic.twitter.com/YOpQfLeaFW
— Cricbuzz (@cricbuzz) February 13, 2026
सलामीवीर मॅट रेनशॉने एकाकी झुंज देत ६५ धावांची खेळी केली. ग्लेन मॅक्सवेलने ३१ धावा केल्या, मात्र ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, कॅमेरून ग्रीन आणि टिम डेव्हिड यांसारख्या मोठ्या नावांनी सपशेल निराशा केली. अखेर ऑस्ट्रेलियाचा डाव १९.३ षटकांत १४६ धावांवर आटोपला.
झिम्बाब्वेने १८ वर्षांनंतर इतिहास रचला –
झिम्बाब्वेने यापूर्वी २००७ च्या पहिल्या टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला हरवून सर्वांना चकित केले होते. तब्बल १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा त्याच पराक्रमाची पुनरावृत्ती करत झिम्बाब्वेने दाखवून दिले की ते कोणालाही धक्का देऊ शकतात. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ गट ‘ब’ मध्ये तिसऱ्या स्थानावर फेकला गेला आहे. त्यांना पुढील फेरीत (सुपर-८) पोहोचण्यासाठी आता श्रीलंका आणि ओमानविरुद्धचे आगामी सामने कोणत्याही परिस्थितीत जिंकणे अनिवार्य आहे.






