AUS Vs WI : ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ ऑलराऊंडरने रचला इतिहास; T-20 क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा 23 वर्षीय अष्टपैलू खेळाडू मिचेल ओवन याने टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पणातच इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात ओवनच्या जलद अर्धशतक आणि महत्त्वपूर्ण विकेटच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 3 विकेटने विजय मिळवला. 7 चेंडू शिल्लक असताना ऑस्ट्रेलियाने आव्हान पूर्ण केले. ओवनने 27 चेंडूत अर्धशतक ठोकले आणि गोलंदाजीत वेस्ट इंडिजचा कर्णधार शाय होप (39 चेंडूत 55) याची विकेट घेत फक्त 14 धावा दिल्या.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ऑस्ट्रेलियाची अवस्था 9व्या षटकात 78/4 अशी बिकट झाली असताना, सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या ओवनने कॅमरून ग्रीनसोबत 40 चेंडूत 80 धावांची निर्णायक भागीदारी केली. ओवनने 27 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, परंतु अल्झारी जोसेफने त्याला बाद केले. तर दुसरीकडे, ग्रीनने 26 चेंडूत 51 धावा केल्या, पण गुडाकेश मोतीने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. या भागीदारीमुळे ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला.
ओवनचा विक्रम
मिचेल ओवनने टी-20 पदार्पणात अर्धशतक आणि विकेट घेणारा पूर्ण सदस्य देशाचा पहिला खेळाडू होण्याचा मान मिळवला. यापूर्वी हा विक्रम आयर्लंडच्या सिमी सिंगच्या नावावर होता, ज्याने 2018 मध्ये नेदरलँड्सविरुद्ध 57 धावा आणि 3 विकेट घेतल्या होत्या. तसेच, सहाव्या क्रमांकावर किंवा त्याखाली फलंदाजी करत पूर्ण सदस्य देशाविरुद्ध पदार्पणात अर्धशतक ठोकणारा ओवन दुसरा खेळाडू ठरला, याआधी इंग्लंडच्या फिल सॉल्टने 2022 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 24 चेंडूत 57 धावा केल्या होत्या. ओवन हा रिकी पॉन्टिंग आणि डेव्हिड वॉर्नरनंतर पदार्पणात अर्धशतक ठोकणारा तिसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू आहे. तसेच, पदार्पणात अर्धशतक आणि विकेट घेणारा तो जगातील 20 वा खेळाडू बनला आहे.
बिग बॅश ते आयपीएल
2024-25 बिग बॅश लीग (BBL) मध्ये होबार्ट हरिकेन्सकडून खेळताना ओवनने 452 धावा आणि 6 विकेट घेतल्या. फायनलमध्ये त्याच्या शतकाच्या जोरावर होबार्टने ट्रॉफी जिंकली. या दमदार कामगिरीमुळे आयपीएलमध्ये पंजाब किंग्जने मिड-सीझनमध्ये ग्लेन मॅक्सवेलच्या जागी ओवनला करारबद्ध केले. ओवनच्या या ऐतिहासिक पदार्पणाने त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवी ओळख मिळवून दिली आहे.





