AUS vs ENG : ॲशेसच्या १०० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाचं असं घडलं! स्टार्क-स्टोक्समुळे पहिला दिवस ठरला ऐतिहासिक

AUS vs ENG Ashes Series 2025 : ॲशेस मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे गोलंदाजांच्या नावावर राहिला. पर्थच्या मैदानावरील हा दिवस इतिहासातील सर्वात नाट्यमय दिवसांपैकी एक ठरला, जिथे एकाच दिवशी १९ विकेट्स पडल्या. १०० वर्षांच्या ॲशेसच्या इतिहासात पहिल्या दिवशी इतक्या विकेट्स पडण्याची ही पहिलीच वेळ आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडचा डाव मिचेल स्टार्कच्या भेदक माऱ्यासमोर १७२ धावांत संपुष्टात आला. तर, प्रत्युत्तरात फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची अवस्था तर त्याहून बिकट झाली. दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने १२३ धावांत ९ विकेट्स गमावल्या होत्या आणि ते अजूनही इंग्लंडच्या धावसंख्येपासून ४९ धावा पिछाडीवर होते.
स्टार्कच्या माऱ्यासमोर इंग्लंडच्या फलंदाजांची शरणागती –
Two amazing fifers on Day 1 of Ashes 2025/26 🔥🔥#Ashes #MitchellStarc #BenStokes pic.twitter.com/jceo4mXPsJ
— Circle of Cricket (@circleofcricket) November 21, 2025
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने इंग्लंडच्या फलंदाजीची कंबर तोडली. त्याने १२.५ षटकांच्या स्पेलमध्ये ५८ धावा देत ७ महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने (५२), ओली पोप (४६) आणि जेमी स्मिथ (३३) यांनी काहीसा प्रतिकार केला, पण स्टार्कच्या माऱ्यापुढे पाहुण्या संघाने सपशेल शरणागती पत्करली.
हेही वाचा – Ruturaj Gaikwad : ऋतुराज गायकवाडची कर्णधारपदी नियुक्ती! ‘या’ १६ सदस्यीय संघाचे करणार नेतृत्व
स्टोक्सची घातक गोलंदाजी –
इंग्लंडला १७२ धावांत गुंडाळल्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. जोफ्रा आर्चरने जेक वेदराल्डला शून्यावर बाद केले. ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजांनी पूर्णपणे निराशा केली. मार्नस लाबुशेन (९), उस्मान ख्वाजा (२) आणि कर्णधार स्टीव्ह स्मिथ (१७) लवकर बाद झाले.
यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने आपल्या घातक गोलंदाजीने महफिल लुटली. त्याने अवघ्या ६ षटकांत २३ धावा देत ऑस्ट्रेलियाच्या ५ मोठ्या फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली. कॅमेरून ग्रीन (२४) आणि ॲलेक्स कॅरी (२६) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण ते पूर्णपणे अपयशी ठरले. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ९ बाद १२३ अशी होती.
हेही वाचा – Smriti Mandhana Video : स्मृती झाली ‘क्लीन बोल्ड’; पलाश मुच्छलने स्टेडियमवर केले रोमँटिक प्रपोज! पाहा VIDEO
१०० वर्षांतील सर्वात मोठा विक्रम –
ॲशेस कसोटीच्या इतिहासात, १०० वर्षांमध्ये पहिल्याच दिवशी १९ विकेट्स पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी १९०९ मध्ये ओल्ड ट्रॅफर्ड येथे पहिल्या दिवशी १८ विकेट्स पडल्या होत्या.





