AUS vs ENG : ऑस्ट्रेलियाचा ॲशेस मालिकेवर कब्जा; मालिका जिंकली असली तरी चौथ्या कसोटीपूर्वी बसला मोठा धक्का!

AUS vs ENG Australia beat England 3rd test : ॲडलेड येथे खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा ८२ धावांनी पराभव करत ऑस्ट्रेलियाने ‘ॲशेस २०२५-२६’ मालिकेवर आपले नाव कोरले आहे. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत ३-० अशी अजिंक्य आघाडी मिळवली आहे. मात्र, मालिका खिशात घातली असली तरी चौथ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणीत वाढ झाली असून, कर्णधार पॅट कमिन्स आणि नॅथन लायन मेलबर्न कसोटीतून बाहेर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पॅट कमिन्स विश्रांती घेणार?
कर्णधार पॅट कमिन्सने पाठीच्या दुखापतीतून सावरल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी या कसोटीतून पुनरागमन केले होते. त्याने या सामन्यात ६ विकेट्स घेत ऑस्ट्रेलियाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे कमिन्स सध्या जखमी नाही, परंतु स्वतःच्या शरीरावरील अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी आणि पुढील सामन्यांसाठी तंदुरुस्त राहण्याच्या उद्देशाने तो मेलबर्न कसोटीतून माघार घेऊ शकतो.
याबाबत बोलताना कमिन्स म्हणाला, “आम्ही मालिका जिंकली आहे, त्यामुळे माझे काम आता पूर्ण झाले आहे असे वाटते. आम्ही रिस्कचा पुन्हा एकदा आढावा घेऊ. मेलबर्नमध्ये मी खेळण्याबाबत साशंक आहे, त्यानंतर आम्ही सिडनी कसोटीबद्दल विचार करू. मालिका जिंकेपर्यंत आम्ही धोका पत्करला होता.”
नॅथन लायनला गंभीर दुखापत –
दुसरीकडे, नॅथन लायनच्या दुखापतीने ऑस्ट्रेलियाची चिंता वाढवली आहे. ॲडलेड कसोटीच्या पाचव्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना त्याच्या उजव्या पायाला दुखापत झाली. स्कॅननंतर तो मैदानाबाहेर बैसाखीच्या सहाय्याने चालताना दिसला. अवघ्या चार दिवसांत मेलबर्न कसोटी सुरू होत असल्याने लायनचे खेळणे कठीण दिसत आहे. त्याच्या अनुपस्थितीत टॉड मर्फी किंवा मॅथ्यू कुहनेमन यांना संधी मिळू शकते.
हेही वाचा – Shubman Gill : ‘घरी कोणाला तरी नजर उतरवायला सांग…’, विश्वचषक संघातून वगळल्यानंतर गावस्करांचा गिलला सल्ला
स्टीव्ह स्मिथकडे धुरा सोपवण्याची शक्यता –
चौथ्या कसोटीत स्टीव्ह स्मिथचे संघात पुनरागमन होऊ शकते. ॲडलेड कसोटीपूर्वी ‘व्हर्टिगो’च्या (चक्कर येणे) लक्षणामुळे स्मिथ बाहेर पडला होता. कमिन्सने विश्रांती घेतल्यास स्मिथ पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करताना दिसेल. मालिका जिंकल्याचा आनंद व्यक्त करताना कमिन्स म्हणाला की, सलग तीन सामने जिंकणे हे अत्यंत समाधानकारक आहे.





