IND vs PAK Final : कोण आहे समीर मिन्हास? ज्याने भारताविरुद्ध ठोकले विक्रमी शतक, पाकिस्तानने उभारला धावांचा डोंगर

Sameer Minhas century in IND vs PAK final : अंडर-१९ आशिया चषक २०२५ च्या हाय-व्होल्टेज अंतिम सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे युवा संघ आमनेसामने आले आहेत. या निर्णायक लढतीत भारतीय कर्णधार आयुष म्हात्रेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पाकिस्तानचा फलंदाज समीर मिन्हासने भारतीय गोलंदाजांचा समाचार घेत मैदानात धावांचा पाऊस पाडला.
समीर मिन्हासचे विक्रमी शतक –
पाकिस्तानची सुरुवात अडखळती झाली होती. सलामीवीर हमजा जहूर अवघ्या १८ धावांवर बाद झाला, तर उस्मान खानने ३५ धावांचे योगदान दिले. मात्र, त्यानंतर समीर मिन्हासने डावाची सूत्रे हाती घेतली. मिन्हासने अवघ्या ७१ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे या स्पर्धेतील दुसरे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. (सर्वात वेगवान शतकाचा विक्रम भारताच्या वैभव सूर्यवंशीच्या नावावर आहे).
— mediaaaa (@pctarchive) December 21, 2025
मिन्हासने एकूण ११३ चेंडूत १७२ धावांची स्फोटक खेळी खेळली, ज्यामध्ये १७ चौकार आणि ९ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. त्याला अहमद हुसैनने मोलाची साथ दिली. हुसैनने ७२ चेंडूत ५६ धावा केल्या. या दोघांच्या भागीदारीमुळे पाकिस्तानने ३७ षटकांच्या अखेरीस २५४ धावांचा टप्पा ओलांडला होता. यानंतर पुढील १३ षटकात ८ बाद ३४७ धावांचा डोंगर उभारला. ज्यामुळे भारतीय संघाला ३४८ धावांचे लक्ष्या मिळाले. भारताकडून खिलान पटेल आणि हेनिल पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स, तर दीपेश देवेंद्रनने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – Team India : टी-२० विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंची घोषणा का नाही? BCCIच्या सचिवांनी सांगितलं कारण
कोण आहे समीर मिन्हास?
२ डिसेंबर २००६ रोजी मुलतानमध्ये जन्मलेला समीर मिन्हास एक अष्टपैलू खेळाडू आहे. विशेष म्हणजे, समीरचा मोठा भाऊ अराफात मिन्हास हा पाकिस्तानच्या वरिष्ठ राष्ट्रीय संघाचा भाग असून त्याने आतापर्यंत चार टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. भावाच्या पावलावर पाऊल ठेवत समीरनेही आज आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
हेही वाचा – Shubman Gill : ‘घरी कोणाला तरी नजर उतरवायला सांग…’, विश्वचषक संघातून वगळल्यानंतर गावस्करांचा गिलला सल्ला
भारत-पाक संघांचा प्रवास –
भारतीय संघ या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत अपराजित राहिला आहे. भारताने उपांत्य फेरीत श्रीलंकेचा पराभव करून फायनलमध्ये धडक मारली होती. दुसरीकडे, पाकिस्तानने सेमीफायनलमध्ये बांगलादेशला ८ गडी राखून नमवले होते. या स्पर्धेत पाकिस्तानचा झालेला एकमेव पराभव भारताविरुद्धच (९० धावांनी) होता, त्यामुळे या अंतिम सामन्यात पाकिस्तान संघ बदला घेण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे.





