दुहेरी हत्याकांडाने औरंगाबाद हादरलं! चारित्र्याच्या संशयावरून पतीकडून पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलीची हत्या

औरंगाबाद : औरंगाबाद शहर दुहेरी हत्याकांडाने हादरले आहे. चारित्र्याच्या संशयावरून एकाने आपल्या पत्नीसह अडीच वर्षांच्या मुलीची मोबाईल चार्जरच्या वायरने गळा आवळून हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
समीर विष्णु म्हस्के असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव असून, पत्नीचे आरती समीर मस्के तर मुलीचे निशात समीर मस्के नाव आहे. पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, औरंगाबादच्या सातारा पोलीस ठाणे हद्दीतील कांचनवाडी परिसरात समीर मस्के हा आपल्या पत्नी आणि दोन वर्षांच्या मुलीसह राहत होता. मात्र आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर तो नेहमी संशय घेत होता. यावरून अनेकदा त्यांच्यात वाद देखील होत होता. दरम्यान काल रात्री पुन्हा यावरून वाद झाला. त्यानंतर समीर मस्के यांनी घरातील नायलॉनच्या दोरी आणि मोबाईल चार्जरच्या वायरने पत्नी आरती आणि मुलगी निशात यांची गळा आवळून हत्या केली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
औरंगाबादच्या सातारा पोलीस ठाणे हद्दीतील कांचनवाडी परिसरात पतीने आपल्या पत्नीची आणि मुलीची हत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. तर आरोपी समीर मस्के याला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे याप्रकरणी समीरच्या आईवर देखील गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचे समोर आले आहे. तर आईनेच आपल्या मुलाला हत्या करण्यासाठी सांगितले असल्याचे आरोप आरतीच्या माहेरच्या लोकांनी केला आहे.
आरती मस्के यांच्या नातेवाईक संतोष सदाशिव सुतार यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, समीर याने आपली आई सुनिता विष्णु म्हस्के यांच्या सांगण्यावर आपल्या पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन तिची हत्या केली आहे. समीरने आधी पत्नी आरतीच्या तोंडात कापडी बोळा कोंबला. त्यानंतर आरतीचा व निशांतचा नायलॉनच्या दोरीने व वायरने गळा आवळून हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी समीर विष्णु म्हस्के आणि त्याची आई सुनिता विष्णु म्हस्के यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.





