Atul Londhe : देश दुःखात; भाजप नेत्यांचे सत्कार सोहळे सुरू; कॉंग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची टीका

मुंबई : पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यामुळे अवघा देश शोकसागरात बुडाला आहे. पण त्यानंतरही भाजप नेते व मंत्री स्वतःच्या सत्कार सोहळ्यांत व्यस्त आहेत. असे हारतुरे घेताना त्यांना लाज कशी वाटत नाही? अशी संतप्त टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शुक्रवारी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधताना केली.
या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी उपरोक्त टीका केली आहे. ते म्हणाले, जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची हत्या केल्याने देशात दुखवटा पाळला जात आहे. संपूर्ण देश या घटनेने हादरला असून जनतेत तीव्र रोष आहे. अमरावती मध्ये 26 तारखेला भाजपा नेत्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यात विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, मंत्री दत्ता भरणे, आमदार गोपीचंद पडळकर आणि इतर नेत्यांचा सत्कार होत आहे.
हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या चितेची राख अजून विझलेली नाही. परंतु भाजपा नेते मात्र हार तुरे घेत आहेत हीच भाजपाची संस्कृती आहे का? राम शिंदे हे संवैधानिक पदावर आहेत, या नेत्यांना जनाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा तरी विचार करायला हवा होता. दुसऱ्याच्या घरी दुःख आहे, त्याचे या भाजपा नेत्यांना काहीच देणेघेणे नाही, असे अतुल लोंढे म्हणाले.





