Atul Londhe : काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांना जीवे मारण्याची धमकी

नागपूर : काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांना अज्ञात व्यक्तीकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने सातत्याने फोन करून अश्लील शिवीगाळ केली आणि “तेरेको देख लेंगे” अशी थेट धमकी दिल्याचा आरोप लोंढे यांनी केला आहे.
लोंढे यांनी सांगितले की, यापूर्वीही त्यांना अशा धमक्या मिळाल्या होत्या, परंतु यावेळची धमकी अधिक गंभीर आहे. “भाजपकडे मुद्द्यांवर उत्तर नसल्याने आम्ही प्रश्न विचारल्यावर ते अस्वस्थ होतात आणि अशा खालच्या पातळीवर उतरतात,” असा गंभीर आरोप त्यांनी भारतीय जनता पक्षावर केला. एका वृत्तवाहिनीवरील फाळणीच्या मुद्द्यावर आयोजित चर्चेत सत्य मांडल्याने काहींना राग आला आणि त्यामुळेच ही धमकी मिळाल्याचा दावा लोंढे यांनी केला. “काँग्रेस नेत्यांना आणि प्रवक्त्यांना धमक्या मिळणे आता सामान्य झाले आहे,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
पोलिसांना तपासाचे आवाहन
लोंढे यांनी पोलिसांना या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. “विचार सहन होत नसतील तर चर्चा बंद करा, पण जीवावर उठणे हा प्रकार लोकशाहीला धोका आहे,” असे त्यांनी ठणकावले. “सरकार यावर शांत राहत असेल तर यात सरकारचा सहभाग आहे का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.





