Atul Londhe : काँग्रेसला महिला विरोधी ठरवणे हास्यास्पद; प्रवक्ते अतुल लोंढे यांची टीका
नागपूर : महिलांचे शोषण आणि बलात्कार प्रकरणांतील आरोपींच्या पाठीशी उभे राहणाऱ्या भाजपने काँग्रेसला महिला विरोधी ठरवणे हे अत्यंत हास्यास्पद असल्याची तीव्र टीका काँग्रेसचे प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली. भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांनी भाजपच्या महिलाविषयक दुटप्पी भूमिकेवर घणाघाती हल्लाबोल केला.
लोंढे म्हणाले की, भाजपने महापालिका निवडणुकीसाठी जाहीरनामा जाहीर केला असला, तरी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी शहराध्यक्ष तिवारी तेथून निघून गेले. एकीकडे काँग्रेसवर महिला विरोधी असल्याचा आरोप केला जातो, मात्र वास्तवात भाजपची भूमिका महिलाविरोधी असल्याचे अनेक उदाहरणांवरून स्पष्ट होते. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या सोनम वांगचूक यांना तुरुंगात डांबले जाते, तर कुलदीप सिंह सेंगरसारख्या बलात्काराच्या आरोपींना जामीन दिला जातो, असा आरोप त्यांनी केला.
हजारो महिला खेळाडूंच्या शोषणाचे आरोप असतानाही भाजपने बृजभूषण सिंह यांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या मुलाला खासदारकीची उमेदवारी दिली, याकडे लोंढे यांनी लक्ष वेधले. तसेच प्रज्वल रेवण्णा प्रकरणात पंतप्रधानांनी प्रचारसभा घेतल्याचा दाखला देत भाजपची महिलांविरोधी मानसिकता उघड केली. राज्यातील महिलांना राजीव गांधी निराधार योजना आणि श्रावण बाळ योजनेचे मानधन मिळत नसल्याने त्यांची अवस्था दयनीय आहे, असे सांगत लोंढे म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांसाठी मोफत बस सेवा, मालमत्ता कर व पाणीपुरवठा मोफत केला जाईल. भाजपच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी कोणतीही ठोस योजना नाही, असा आरोपही त्यांनी केला.





