नववर्षानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फळा-फुलांची सजावट; दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी

पंढरपूर – काल सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. हे चित्र फक्त मुंबई-पुण्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यासह देश आणि जगात दिसत होतं. करोनाच्या संकटातून बाहेर पडल्यानंतर जगभरातील लोकांनी अत्यंत जल्लोषात नाचतगात नववर्षाचं स्वागत केलं.
तसेच बरोबर 12 चा ठोका पडताच हॅपी न्यू इयर म्हणत लोकांनी एकमेकांना अलिंगनही दिली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरून जोश आणि आनंद ओसंडून वाहताना दिसत होता. आणि याचेच औचित्य साधून आज संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
विठूरायाचा आणि रुक्मिणी मातेचा गाभारा, सभामंडप, मंदिरातील खांब या सर्व ठिकाणी आकर्षक फुलांची आणि फळांची सजावट केली आहे. यावेळी संपूर्ण मंदिर परिसरात भक्तीचे वातावरण पाहायला मिळत आहे.
सोशल मीडियावर देखील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील फोटो व्हायरल होत असून, सर्वच जण यावर कमेंट आणि लाईक्स करत आहेत. दरम्यान, आज पहाटेपासूनच श्री विठुरायचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भक्त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद पाहायला मिळत आहे. देवाचे हे रुप पाहून सर्वांच्या डोळ्याचे पारणेच फिटले.





