लक्ष मुंबई महापालिका! शिंदेंच्या २१ शिलेदारांची फौज रणांगणात उतरणार; शिवसेनेची मुख्य कार्यकारणी समिती जाहीर

Mumbai Municipal Corporation Election : राज्यात आता महापालिकेच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधनीला सुरूवात केली आहे. पक्षाच्या वतीने बैठका भेटीगाठी वाढल्या आहेत. सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जोरदार तयारी विविध पक्षांकडून केली जात आहे. या सगळ्या पाश्वभूमीवर आघाडीमधून उद्धव ठाकरे बाहेर पडणार असल्याच्या चर्चा होत आहेत.
याशिवाय नुकतीच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवास्थानी जाऊन भेट घेतली. या बैठकीला राजकीय किनारही असल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली असून, यामुळे दसरा मेळाव्याला पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
अशातच शिवसेना शिंदे पक्षानेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पक्षाच्या वतीने मुख्य कार्यकारणी समिती जाहीर करण्यात आली आहे. या समितीमध्ये शिवसेना प्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याह २१ नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे.
आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीसाठी पक्षातील महत्वाचे निर्णय या समितीच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत. या समितीमध्ये माजी खासदार, आमदार शिवसेनेचे प्रमुख नेत्यांवर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष स्वतः एकनाथ शिंदे हे असणार आहेत.
कोण आहेत समितीमधील २१ नेते?
या समितीत रामदास कदम, गजानन कीर्तीकर, आनंदराव अडसुळ, मिनाताई कांबळे, श्रीकांत शिंदे, रवींद्र वायकर, मिलिंद देवरा, राहुल शेवाळे, संजय निरुपम, प्रकाश सुर्वे, अशोक पाटील, मुर्ची पटेल, दिलीप लांडे, तुकाराम काते, मंगेश कुडाळकर, मनीषा कायंदे, सदा सरवणकर, यामिनी जाधव, दिपक सावंत, शिशिर शिंदे यांचा समावेश करण्यात आला आहे.
अंतर्गत वाद?
दुसरीकडे शिवसेना पक्षात अंतर्गत नाराजी असल्याची चर्चा सुरू आहे. मुंबईमधील प्रभारी विभाग प्रमुख आणि प्रभारी विधानसभा प्रमुखांच्या निवडीवरून अंतर्गत नाराजी होत असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. तर नाराजांना ठाकरे गटाकडून संपर्क साधण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
हेही वाचा : “सिंदूर के सन्मान मै, शिवसेना मैदान मै’; भारत-पाकिस्तान मॅचविरोधात ठाकरे गट उतरणार रस्त्यावर





