pune gramin । अल्पवयीन मुलाकडून महिलेच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न; सतरा वर्षाच्या मुलावर गुन्हा दाखल

आळंदी : पुण्यातील पोर्शे कारची पुनरावृत्ती आळंदीजवळील वडगाव घेनंद येथे घडली. विधीसंघर्षित सतरा वर्षीय मुलाने भरधाव वेगात चारचाकी गाडी चालवून महिला आणि तिथे जमलेल्या लोकांच्या अंगावर जात जिवास हानी पोचविण्याचा प्रयत्न केला. आळंदी पोलिसांनी या प्रकरणी सतरा वर्षाच्या विधीसंघर्षित मुलावर गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी फिर्याद वडगाव घेनंद येथील नाजुका रणजित थोरात यांनी दिली. ही घटना तीन दिवसांपूर्वी शनिवारी (ता. १५) घडलीये. याबाबतचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने आळंदी आणि परिसरात खळबळ उडाली आहे. पुण्यात नुकतेच ताजे प्रकरण असलेल्या पोर्शे कार अपघात घटनेची पुनरावृत्ती असल्याची चर्चा नागरिक करत होते.
आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव घेनंदमधील गणेश नगरमधे फिर्यादी नाजुका थोरात राहत आहेत. थोरात यांच्यासोबत विधीसंघर्षित मुलासोबतचा पूर्वी असलेल्या भांडणाच्या रागातून हे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
विधीसंघर्षित मुलाने त्याच्याकडील चारचाकी कार (एमएच १४, एचडी ५७४९) जोरात चालवून नाजुका थोरात यांच्या अंगावर गाडी घातली. मात्र, थोरात बाजूला झाल्याने वाचल्या. थोडीशी दुखापत थोरात यांना झाली.
कार पुढे घेऊन गेल्यानंतर या मुलाने कारच्या टपावर उभे राहून शर्ट काढला आणि थोरात यांच्याकडे पाहून शिवीगाळ करत होता. दरम्यान, जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली आळंदी पोलिस ठाण्यात विधीसंघर्षित बालकावर गुन्हा दाखल केला आहे.
संबंधित बालकाला आळंदी पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाल न्यायालयाने त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आल्याचे आळंदी पोलिसांनी सांगितले.
आळंदी आणि परिसरात जमिनींना चांगले भाव आले आहेत. अनेकजण जमिनी विकून चारचाकी गाड्या घेतात. लहान मुलांच्या हातात कमी वयात गाड्या आल्याने अशीच लहान वयातील मुले भरधाव वेगात गाड्या चालवित असल्याचे चित्र सर्रास आहे.
अडीच महिन्यांपूर्वी च-होलीमधे एका वाहतूक पोलिसालाही एका महाभागाने कार अंगावर घालून गंभीर जखमी केले होते. यामुळे लहान वयात गाड्या चालविणा-यांकडे पोलिसांनी कडक कारवाईची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.





