तब्बल ४८ नेत्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न; मंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

कर्नाटक : कर्नाटकामध्ये हनीट्रॅपचे प्रकरण समोर आले आहे. यामध्ये एक-दोन नव्हे तर तब्बल ४८ मंत्री, आमदार अडकल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाटकची राजधानी बंगळुरूतील दोन मंत्री आणि कर्नाटकातील बड्या मंत्र्यांना हॅनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये जे नेतेमंडळी अडकले आहेत, त्यांना राजकारणातून संपवण्याच्या हेतूने हॅनीट्रॅपचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा सुरु आहे.
या आरोपांबाबत गुरुवारी (ता. २०) विधानसभेत चांगलाच विषय गाजला. सत्तारुढ आणि विरोधी पक्षातील सुमारे ४८ नेत्यांना यामध्ये गोवण्यात येत असल्याबाबत दीर्घ चर्चा करण्यात आली. सरकारने या प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष पोलिस दल (एसआयटी) स्थापनेची घोषणा केली आहे.
भाजप आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी काही प्रभावी नेत्यांना हनीट्रॅपमध्ये अडकवण्यात येत असल्याचा विषय विधानसभेत मांडला. त्यावर सत्तारुढ आणि विरोधी पक्षातील आमदारांनी पक्षभेद विसरुन चर्चा केली. गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी हा विषय गंभीर असून यामागील सूत्रधार उघडकीस आला पाहिजे असे सांगितले. एसआयटीकडे हे प्रकरण सोपवण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली.
सहकार मंत्री के. एन. राजण्णा यांनी याविषयी संबंधितांनी गृहमंत्र्यांना लेखी तक्रार दिल्यास बरे होईल, असा सल्ला दिला. काही दिवसांपासून कर्नाटक हा सीडी आणि पेन ड्राईव्हचा कारखाना बनला आहे. यामागील दिग्दर्शक, निर्माता समोर येणे गरजेचे आहे. यामधील अभिनेते आणि अभिनेत्रींबाबतही कुतूहल आहे. सुमारे ४८ जणांविरुद्ध सीडी, पेनड्राईव्ह आहेत. हनी ट्रॅपमध्ये त्यांना गोवण्यात आले आहे. राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी आणि मोठे पद मिळवण्यासाठीच असे करण्यात आले असेल, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय?
हनीट्रॅप हा एखादी गुप्त माहिती बाहेर काढण्याचा मार्ग समजला जातो. यामध्ये सुंदर महिलांचा समावेश होतो. शत्रू देशाची गुप्त माहिती बाहेर काढण्यासाठी संबधित देशाच्या मोठ्या पदावरील व्यक्तीला यात टार्गेट केले जाते. या शिवाय मोठ्या व्यक्तीच्या जवळच्या माणसाला ही या ट्रॅपमध्ये अडकवले जाऊ शकते. काही चालकही यात फसले असल्याची उदाहरणे आहे. या प्रकारात एखाद्या व्यक्तीशी प्रेम किंवा लैंगिक संबंध निर्माण केले जातात. त्यातून संबंधित व्यक्तीकडून गोपनीय माहिती काढून घेतली जाते. असा प्रकार या हनीट्रॅपमधून केला जातो. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.





