“निष्पक्ष टीव्ही माध्यमाचा शेवटचा बुरूज ढासळला”, अनेकांनी व्यक्त केला संताप

नवी दिल्ली – अदानी आणि अंबानी या उद्योग समुहांमार्फत देशातील बहुतांशी वृत्तवाहिन्यांवर मोदींनी कब्जा केला असल्याची सार्वत्रिक ओरड सुरू असतानाच आता एनडीटीव्हीवरही अदानी उद्योगामार्फत कब्जा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यावरून कॉंग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्ला बोल केला आहे. या प्रकाराद्वारे निष्पक्ष टीव्ही माध्यमाचा शेवटचा बुरूजही ढासळला असल्याची प्रतिक्रीया अपक्ष खासदार कपिल सिब्बल यांनी दिली आहे. कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे की, मोदींच्या खास दोस्तां मार्फत निष्पक्ष माध्यमांवर नियंत्रण मिळवण्याचा हा निर्लज्ज प्रयत्न आहे.
अदानी उद्योग समुहाने या आधीच अन्य कंपन्यांमार्फत एनडीटीव्हीचे 29.18 टक्के शेअर्स विकत घेतले आहेत. आता त्यांनी पुन्हा एनडीटीव्हीचे 26 टक्के शेअर्स जबरदस्तीने विकत घेण्याचा प्रयत्न करून या टीव्ही वाहिनीवर संपुर्ण नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न चालवला आहे. देशातील बहुतांशी वृत्तवाहिन्या या आधीच भाजप व मोदींच्या कब्जात गेल्या आहेत. केवळ एनडीटीव्ही हा एकमेव समुह अजून त्यांच्या प्रभावाखाली आलेला नव्हता. त्यामुळे तो अडचणीचा ठरत असल्याने त्यावरही अदानी उद्योग समुहामार्फत कब्जा मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याच्या वृत्ताने माध्यम क्षेत्रात मोठीच खळबळ माजली आहे.
या संबंधात एनडीटीव्हीने म्हटले आहे की आमच्याशी कोणतीही चर्चा न करता किंवा आम्हाला काल पर्यंत कोणतीही कल्पना न देता आमच्या समुहावर अदानींनी कब्जा केला आहे. या सगळ्या संशयास्पदरितीने झालेल्या व्यवहारात विश्वप्रधान अत्यंत जवळून सामिल असल्याचा दावाहीं कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी केला आहे.
अदानी समुहाने एनडीटीव्हीचे 29.18 टक्के शेअर्स कसे शिताफीने प्राप्त केले होते याची कहाणी पुढे आली आहे. मुकेश अंबानी यांच्या एका कंपनी मार्फत सन 2008-09 साली एनडीटीव्हीला 250 कोटी रूपयांचे कर्ज देण्यात आले होते. ज्या कंपनीमार्फत एनडीटीव्हीला हे कर्ज दिले गेले, ती कंपनी अदानी उद्योग समुहाने ताब्यात घेतली. आणि कर्ज रकमेच्या बदल्यात त्यांनी एनडीटीव्हीचे 29.18 टक्के शेअर्स आपल्या नावावर करून घेतले. आणि आता आणखी 26 टक्के शेअर्स अदानी समुहाकडून विकत घेतले जाणार असून हा व्यवहार झाला तर एनडीटीव्ही पुर्णपणे मोदींच्या प्रभावाखाली जाणार असल्याची चर्चा आहे.





