ग्रीसच्या दौऱ्यात पोप फ्रान्सिस यांना धक्काबुक्कीचा प्रयत्न

अतेन्स – ग्रीसच्या दौऱ्यावर असलेले ख्रिश्चनांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांना आज ऑर्थोडॉक्स चर्चच्या एका ज्येष्ठ धर्मोपदेशकाकडून धक्काबुक्की झाली. ग्रीसमधील ऑर्थोडॉक्स चर्चच्या वरिष्ठ धर्मगुरूंबरोबरच्या बैठकीसाठी पोप ग्रीसमध्ये आले असताना हा प्रकार घडला.
सुमारे 1,200 वर्षांपूर्वीपासून कॅथोलिक आणि ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये मतभिन्नता निर्माण झाली. तेंव्हापासून प्रथमच थेट पोप यांच्याविरोधात ऑर्थोडॉक्स चर्चच्या धर्मोपदेशकाकडून प्रत्यक्ष विरोधाची भूमिका घेतली गेली आहे.
ग्रीसची राजधानी अतेन्समध्ये आर्चबिशप आरोनिमस यांच्या घरी पोप आले असताना “पोप तुम्ही पाखंडी आहात.’ असे हे धर्मगुरू तीनवेळा ओरडले. मात्र पालिसांनी त्यांना दूर नेण्याचा प्रयत्न केला तेंव्हा ते खाली पडले. पोप यांना ही बाब लक्षातच आली नाही. ते आर्चबिशप यांच्या निवासस्थानाच्या दिशेने चालत राहिले.
पोप यांच्या याच दौऱ्यादरम्यान अशीच आणखीन एक घटना घडली. सायप्रसमध्ये पोप यांच्याविरोधात निदर्शने करण्याचा एक छोटा प्रयत्न झाला होता. ऑर्थोडॉक्स आणि कॅतोलिक चर्चमधील विसंवाद दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही दोन्ही चर्चच्या धर्मगुरूंनी दिली होती. मात्र धर्मगुरूकडूनच पोप यांना धक्काबुक्की करण्याच्या प्रयत्नामुळे हा दावा किती फोल आहे, हे स्पष्ट झाले आहे.





