Pope Francis : हजारोंच्या उपस्थितीत ‘पोप फ्रान्सिस’ यांच्यावर अंत्यसंस्कार; जगभरातील अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित

Pope Francis – ख्रिश्चन धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांच्य पार्थिवावर आज हजारोंच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या प्रसंगी जगभरातील प्रमुख देशांचे राष्ट्रप्रमुख आणि कॅथोलिक चर्चचे वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी वयाच्या ८८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
राष्ट्रप्रमुख आणि राजघराण्यातील सदस्य सेंट पीटर्स स्वेअर येथील सामुहिक प्रार्थनेमध्ये सहभागी झाले. तर बॅसिलिका येथे पोप यांच्या दफनविधाला विविध देशांमधून आलेले शरणार्थी आणि कैदी उपस्थित राहिले होते. पोप फ्रान्सिस यांच्यासाठी बॅसिलिका चर्चमध्ये करण्यात आलेल्या सामुहिक प्रार्थनेसाठी तब्बल अडीच लाख लोकांनी उपस्थिती लावली होती.
तर पोप फ्रान्सिस यांची शवपेटी ठेवलेल्या मोटारगाडीच्या मार्गावर हजारो लोक रांगेत उभे होते, टाळ्या वाजवत आणि पापा फ्रान्सिस्कोचा जयजयकार करत होते. शहराच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या सेंट मेरी मेजर बॅसिलिका येथील दफनभूमीत जागतिक रोमन कॅथोलिक चर्चच्या प्रमुखांचा दफनविधी करण्यात आला.
सेंट पीटर्स स्क्वेअरमध्ये सुमारे २ तास चाललेल्या या अंत्यसंस्कारात विविध विधी पार पडले. तत्पुर्वी स्वीस गार्डच्या वाहनातून पोप यांचे पार्थिव चर्चमध्ये नेण्यात आले. कार्डिनल्स कॉलेजचे ९१ वर्षीय डीन कार्डिनल जियोव्हानी बॅटिस्टा रे यांनी फ्रान्सिस यांच्या कार्याची प्रशंसा केली, ते लोकांचे पोप होते, ते एक असे पाद्री होते.
ज्यांना अनौपचारिक, उत्स्फूर्त शैलीने आपल्यातील कमीत कमी लोकांशी कसे संवाद साधायचा हे माहित होते. ते सर्वांप्रती खुले मन असलेले लोकांमधील पोप होते, असे कार्डिनल यांनी सांगितले. पोप फ्रान्सिस यांच्या १२ वर्षांच्या पोप पदाच्या कार्यकाळात त्यांनी ख्रिश्चनांमधील कट्टरवादी प्रथांमधील सुधारणांना प्राधान्य दिले, याचा उल्लेख देखील कार्डिनलनी आवर्जुन केला.
अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित
पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, माजी अध्यक्ष ज्यो बायडेन, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदायमिर झेलेन्स्की, संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्टोनिओ गुटेरेस आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्यासह ब्रिटनचे युवराज विल्यम्स आणि युरोपातील राजघराण्यांचे वंशज देखील उपस्थित होते. शिवाय १६० मान्यवर देखील या प्रसंगी उपस्थित होते. पोप फ्रान्सिस हे मूळचे अर्जेंटिनाचे नागरिक होते. त्या नात्याने अर्जेंटिनाचे अध्यक्ष झेवियर मिलेई हे देखील मान्यवरांमध्ये उपस्थित राहिले होते.
ट्रम्प आणि झेलेन्स्की यांची भेट
पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराच्या निमित्ताने अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांची अल्पकाळ भेट झाली. दोघांमध्ये अल्पकाळ संवाद देखील झाला. मात्र पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराचे निमित्त असल्यामुळे कोणतीही राजकीय चर्चा यावेळी होऊ शकली नाही. शांततादूताला अंतिम निरोप देत असताना दोन्ही नेत्यांमध्ये शांततेची चर्चा झाली, असावी, असा अंदाज निरीक्षकांकडून व्यक्त होत होता.
कडेकोट बंदोबस्त आणि लाईव्ह प्रक्षेपण
२०१५ च्या फिलीपिन्स दौऱ्यात वापरलेल्या उघड्या पोपमोबाईलवर फ्रान्सिस यांची शवपेटी ठेवण्यात आली होती. या शवपेटीसह शहरातून निघालेल्या अंत्ययात्रेचे आणि सामूहिक प्रार्थनेचे जगभरात थेट प्रक्षेपण करण्यात आले.
या प्रसंगी इटलीच्या प्रसासनाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. २,५०० पोलीस आणि १,५०० सैनिक अंत्ययात्रेच्या मार्गावर बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. बंदोबस्ताचा भाग म्हणून पोलिसांच्या हेलिकॉप्टरमधून देखरेख देखील केली जात होती.
४० विशेष अतिथी
व्हॅटिकनच्या कॅरिटास चॅरिटी आणि सँट एजिडिओ समुदायाने आयोजित केलेले चाळीस विशेष पाहुणे बॅसिलिका येथे उपस्थित राहिले होते. यामध्ये पोप फ्रान्सिस यांनी पोप म्हणून प्राधान्य दिलेल्या दुर्लक्षित गट, बेघर लोक आणि स्थलांतरित, कैदी आणि ट्रान्सजेंडर लोकांना विशेष स्थान देण्यात आले होते.
आजच्या दिवशी पोप यांना अखेरचा निरोप देण्यासाठी तब्बल अडीच लाख लोक पोप यांच्या अंत्यदर्शनासाठी राग लावून थांबले होते. शुक्रवारी संध्याकाळी बॅसिलिका चर्चचे दरवाजे बंद केले गेले होते. अंत्यदर्शनासाठी थांबलेल्यां हजारो जणांना पोप यांचे अंत्यदर्शन देखील मिळू शकले नाही. त्यांना शनिवारी पहाटे पुन्हा बॅसिलिकाच्या दारात रांग लावून थांबावे लागले होते.





