Abhishek Banerjee : लोकशाहीत लोकप्रतिनिधींवरील हल्ल्यांना कोणतेही स्थान नाही.! अभिषेक बॅनर्जींवरील हल्ल्याचा भाकपकडून निषेध
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर सुरू असलेल्या हिंसेचा तीव्र निषेध केला.

Abhishek Banerjee – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस डी. राजा यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील निवडणूक निकालानंतर सुरू असलेल्या हिंसेचा तीव्र निषेध केला. लोकशाहीत लोकप्रतिनिधींवर होणारे शारीरिक हल्ले आणि तोडफोडीला कोणतेही स्थान नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
पश्चिम बंगालमधील सोनारपूर भागात निवडणूक निकालोत्तर हिंसेचा फटका बसलेल्या कुटुंबांची भेट घेण्यासाठी गेलेले तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाल्यानंतर एका दिवसाने डी. राजा यांचे हे वक्तव्य आले आहे.
दरम्यान, रविवारी पश्चिम बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील एका पोलीस ठाण्यासमोर जमावाने घेरल्यामुळे आपल्या डोक्याला दुखापत झाल्याचा दावा टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी यांनीही केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांना झालेल्या अटकेविरोधात निवेदन देण्यासाठी ते पोलीस ठाण्यात पोहोचले होते.
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर सुरू असलेल्या हिंसेच्या घटना अत्यंत चिंताजनक आहेत आणि या घटनांचा तीव्र निषेध केला पाहिजे. लोकप्रतिनिधींवर होणारे शारीरिक हल्ले आणि तोडफोडीच्या कृत्यांना लोकशाहीत जागा नाही. निवडणुका या जनतेची इच्छा प्रतिबिंबित करण्यासाठी असतात, हिंसेच्या माध्यमातून राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी नाही, असे राजा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
भाजप, ज्यांच्यावर आता कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे, ते आपली जबाबदारी झटकू शकत नाहीत. त्यांचे स्वतःचे समर्थक हिंसक कृत्यांमध्ये सामील असणे, राजकीय पक्षांच्या कार्यालयांवर हल्ले करणे आणि लेनिन यांच्या पुतळ्यासारख्या सार्वजनिक प्रतीकांची तोडफोड करणे या अत्यंत चिंतेच्या बाबी आहेत, असे राजा यांनी म्हटले.
सरकारने कोणत्याही पक्षपाताशिवाय काम केले पाहिजे, शांतता प्रस्थापित केली पाहिजे आणि राजकीय पार्श्वभूमीचा विचार न करता या हिंसेसाठी जबाबदार असलेल्या सर्वांना न्यायाच्या पिंजऱ्यात उभे केले पाहिजे.





