Bangladesh Violence: बांगलादेशात भारतीय सांस्कृतिक केंद्रावर हल्ला; ४ हिंदू मंदिरांचे नुकसान

Bangladesh Violence – बांगलादेशात भारतीय सांस्कृतिक केंद्रावर आज जमावाने हल्ला केला आणि या केंद्राची तोडफोड केली. या शिवाय देशभरातील चार हिंदू मंदिरांचेही किरकोळ नुकसान करण्यात आले. बांगलादेशातील हिंदू बौद्ध ख्रिश्चन एकता परिषदेचे नेते काजोल देबनाथ यांनी ही माहीती दिली.
ढाक्याच्या धानमंडी भागात असलेल्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्राचे अनियंत्रित जमावाने नुकसान केले. मार्च २०१० मध्ये औपचारिकपणे उद्घाटन झालेल्या केंद्राद्वारे सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित केल्या जात असत.
या कार्यक्रमात योग, हिंदी, भारतीय शास्त्रीय गायन संगीत, कथ्थक, मणिपुरी आणि भारतीय नृत्यांसाठी भारतातील मार्गदर्शक आणि प्रशिक्षकांच्या सहभागाने भारत आणि बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय सांस्कृतिक संबंधांना प्रोत्साहन दिले जात असायचे. या केंद्रातील ग्रंथालयात भारतीय कलांविषयी २१ हजार पुस्तके आहेत.
आंदोलकांनी ढाकामधील बंगबंधू स्मारक संग्रहालय म्हणूनही ओळखले जाणाऱ्या बंगबंधू भवनासह अनेक महत्त्वाच्या ठिकाणी आग लावल्या. हे संग्रहालय हसिना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान यांना समर्पित होते. रहमान यांची १९७५ मध्ये अध्यक्ष असताना हत्या झाली होती.





