हनुमान टेकडीच्या पायथ्याला चर खोदाई; जंगली महाराज रस्त्यावरील पूरस्थिती रोखण्यासाठी काम

पुणे– फर्ग्यूसन महाविद्यालयाच्या मागील हनुमान टेकडीवरून जंगली महाराज रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी येते. ते रोखण्यासाठी टेकडीच्या पायथ्याला तसेच पाणी वाहून येत असलेल्या भागांत चर आणि खड्डे घेण्याचे काम महापालिकेकडून सुरू करण्यात आलेले आहे. आयुक्त विक्रम कुमार यांनी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात या भागाची पाहणी केली होती.
तसेच फर्ग्यूसन महाविद्यालय प्रशासनाशी चर्चा केली होती. गेल्या काही वर्षांत टेकड्यांच्या परिसरात अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होऊन टेकडीवरून वाहून जाणारे पावसाचे पाणी वाट मिळेल त्या दिशेने खाली येत आहे. नाले, ओढे तसेच घळईवर अतिक्रमणे झाल्याने ही स्थिती आहे. मागील वर्षी हे पाणी टेकडीवरून फर्गसन महाविद्यालय आणि पुढे उताराने घोले रस्त्याने बालगंधर्व चौकापर्यंत आले. पाण्याचे प्रमाण एवढे होते, की ते पुढे डेक्कनच्या दिशेने गेले. त्यामुळे तळ साचण्यास सुरुवात झाली. प्रशासनाने टेकडीचे पाणी टेकडीच्या पायथ्यालाच जिरवण्याचा निर्णय घेतला आहे.
तळ्यांचीही स्वच्छता
फर्गसन महाविद्यालच्या आवारात असलेल्या दोन तळ्यांचीही खोली पालिकेकडून वाढविण्यात येणार आहेत. ही तळी सध्या मातीने बुजलेली असून त्यात, पावसाळ्यात काही प्रमाणात पाणी असते. मात्र, यंदा महापालिका ती खोल करणार असून त्यातही पावसाचे पाणी वळविण्यात येणार आहे. महाविद्यालयाने त्यास संमती दिल्याने महापालिकेने हे काम सुरू केले असून, त्यासाठी चार जेसीबीद्वारे हे काम सुरू असल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ. खेमनार यांनी स्पष्ट केले.





