पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – रस्त्यात सुरू असलेली हाणामारी थांबविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकावर सराईत गुन्हेगाराने कोयत्याने हल्ला केला. यामध्ये डोक्यावर वार बसल्याने सहायक पोलीस निरीक्षक गंभीर जखमी झाला आहे. कोयत्याने हल्ला करणारा हल्लेखोर हा १८ वर्षांचा असून त्याच्यावर तब्बल २० गुन्हे दाखल आहेत. रत्नदीप गायकवाड असे जखमी अधिकाऱ्याचे नाव आहे. तर त्यांच्यावर हल्ला करणारा निहालसिंग मन्नू सिंग टाक (१८,रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर) हा आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात दोघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गायकवाड हे वानवडी पोलीस पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. ते दुपारी चारच्या सुमारास ससाणेनगर येथे गस्तीवर चालले होते. तेव्हा रेल्वे फाटकाजवळली एका गॅरेजसमोर निहालसिंग आणि त्याचा साथीदार स्कुटरवरील व्यक्तींना मारहाण करत होते. त्यांच्याकडे कोयते होते. गायकवाड यांनी ही घटना पाहिली आणि ते धावून गेले. तेव्हा निहालसिंग याने कोयता गायकवाड यांच्या दिशेने फेकून मारला. तो कोयता त्यांच्या डोक्यात लागल्याने मोठी जखम झाली. गायकवाड जखमी झाल्याचे दिसताच निहालसिंगने दुचाकीवरुन सय्यदनगरकडे पळ काढला. नागरिकांनी गायकवाड यांना रुग्णालयात दाखल केले. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळताच त्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या शोधासाठी पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आल्याची माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ पाच) आर. राजा यांनी दिली. हल्ल्यांमुळे पोलिसांचे मनोबल खच्ची पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ले आणि खोटया तक्रारींचे प्रमाण मागील काही वर्षांत वाढले आहे. वाहतूक पोलिसांवर सर्वाधिक हल्ले होत आहेत. हडपसर भागाातील हांडेवाडी भागात वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मोटारचालकाने शिवीगाळ करुन पोटात लाथ मारल्याची घटना घडली. तर दुसरीकडे गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यास जाणाऱ्या पोलीस पथकावर गुन्हेगारी टोळ्या खोटे आरोपी करुन तक्रारी करत आहेत. यामुळे पोलिसांचे मनोबल खच्ची झाले आहे. मागील वर्षभरात सराईत गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यास गेलेल्या पोलिसांवर खोटे आरोप करुन त्यांना चौकशीला सामोरे जाण्याच्या दोन ते तीन घटना घडल्या आहेत.