Chinchwad Crime : ‘घोलप गँग’चा थरार! तरुणावर कोयत्याने वार करून केलं अपहरण; भरदिवसा घडलेल्या घटनेने शहरात दहशत
Chinchwad Crime : अपहरण करून मारहाण करणाऱ्या घोलप गँगच्या ४ सदस्यांना काही तासांत अटक; मुख्य आरोपींचा शोध सुरू.

Chinchwad Crime – जुन्या वादातून घोलप गँगकडून तरुणावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तरुणाचे अपहरणही केले. ही घटना मंगळवारी (दि. १० फेब्रुवारी) रोजी दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास केशवनगर येथील मराठी शाळेसमोर घडली.विकी अनिल घोलप (वय ३१, रा. शिरगाव परंदवाडी, ता. मावळ), मयुर अनिल घोलप (वय ३३), शुभम विनायक चौधरी (वय २९, रा. गावडे भोईर आळी, चिंचवड), आदित्य अशोक चव्हाण (वय २९, रा. भिमनगर, चिंचवड),
मंगेश नंदकुमार सांगळे (वय २७, रा. काकडे पार्क, चिंचवड), प्रसाद उर्फ सोन्या मारुती साबळे (वय २३, रा. मोरेवस्ती, चिखली) व समीर कोंडीराम भोईर (रा. चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींची नावे आहेत. यातील चौधरी, सांगळे, साबळे आणि भोईर या आरोपींना अटक करण्यात आली आहे. आशितोष संतोष वराडे (वय २२, रा. वराडे चाळ, गावडे भोईर आळी, चिंचवड) असे जखमी तरुणाचे नाव असून त्यांनी मंगळवारी (दि. १०) याबाबत चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी केशवनगर परिसरातून जात असताना आरोपींनी कोयता हवेत फिरवत दहशत निर्माण केली. फिर्यादी यांच्या डोक्यावर कोयत्याने वार करीत त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवून मारहाण करण्यात आली. गावडे तलाव परिसरात नेऊनही लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. चिंचवड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.




