Assembly Monsoon Session 2024 : राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प 28 जूनला, शिंदे सरकारचे ठरणार अखेरचे अधिवेशन…

मुंबई – राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला येत्या 27 जूनपासून सुरूवात होत आहे. तर हे अधिवेशन 12 जुलैपर्यंत चालणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यामध्ये गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार असे 3 दिवस कामकाज होणार आहे. तर त्यानंतरचे 2 आठवडे सोमवार ते शुक्रवार कामकाज होणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी 27 जून रोजी पुरवणी मागण्या आणि राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाईल.
तर दुसऱ्या दिवशी म्हणजे 28 जूनला राज्याचा सन 2024 -25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यामध्ये विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यामुळे अतिरिक्त अर्थसंकल्पात विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडला जाण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी शुक्रवारी (ता. 14 जून) विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. 18व्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन फेब्रुवारी महिन्यात पार पडले होते. या अधिवेशनात एप्रिल ते जुलै 2024 या 4 महिन्यांसाठी लेखानुदान मांडून ते मंजूर करण्यात आले होते. त्यामुळे आता या अधिवेशनात 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री आणि वित्त मंत्री अजित पवार हे महायुती सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. लोकसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणा होण्याची शक्यता आहे.





