Assembly Elections 2024 | ‘मोदींच्या एक देश एक निवडणूक धोरणाचे काय झाले?’; महाराष्ट्रातील निवडणुका लांबल्याने शरद पवारांचा सवाल

Sharad Pawar । Assembly Elections 2024 | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक देश एक निवडणुकीचा आग्रह धरला असतानाही चार राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी का घेतल्या जात नाहीत, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी केला आहे.
एका कार्यक्रमाच्या निमित्ताने नागपुरात पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, ‘पंतप्रधान मोदी जे बोलतात त्यात तथ्य नसते आणि त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवता येत नाही. मोदींनी त्यांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात एक देश एक निवडणुकीचा आग्रह धरला होता, असे ते म्हणाले.
निवडणूक आयोगाने शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन टप्प्यातील आणि हरियाणामध्ये सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मतदानाचा कार्यक्रम जाहीर केला. हरियाणाबरोबरच महाराष्ट्राच्या निवडणुका होतात पण यावेळी महाराष्ट्राच्या निवडणुका मात्र जाहीर झालेल्या नाहीत, त्या अनुषंगाने पवार यांनी ही टीका केली आहे.
दोन राज्यांमध्ये निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत पण झारखंड आणि महाराष्ट्रातील निवडणुका जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे मोदी जे बोलतात त्यात तथ्य नसते असे ते म्हणाले. असे दिसते आहे की भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला महाराष्ट्रातील लोकांना “मूर्ख” बनवण्यासाठी आणखी वेळ हवा असावा अशी टिप्पणीही त्यांनी केली.
हिंदू धर्मगुरू रामगिरी महाराज यांनी प्रेषित मोहम्मद आणि इस्लाम यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमधील तणावाच्या प्रश्नावर पवार म्हणाले की,असे प्रकार समाजाच्या हिताचे नाहीत. आज शांततेची गरज असून, समाज आणि राजकारण्यांनी याबाबत संयम व सावधगिरी बाळगली पाहिजे, असे पवार म्हणाले.
सरकार आणि गृहखात्याची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे, असे ते म्हणाले. बांगलादेशातील सत्ताबदलाबद्दल पवार म्हणाले की, भारतात काही ठिकाणी त्यावर काही प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र, बांगलादेशात जे घडले त्यावर महाराष्ट्रातून प्रतिक्रिया येतील असे आम्हाला कधीच वाटले नाही, असेही ते म्हणाले.
हे देखील नक्की वाचा…





