Ias transfers : आसाम सरकारने आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठा प्रशासकीय फेरबदल केला आहे. राज्यातील १५ वरिष्ठ IAS आणि ACS अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नवीन नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. हे बदल निवडणुकीपूर्वी प्रशासनाला अधिक सक्रिय आणि बळकट करण्यासाठी उचलण्यात आले असून, अनेक जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाधिकारी आणि विभागीय सचिवांची नेमणूक झाली आहे. राज्याच्या कार्मिक विभागाच्या सचिव मोनिता बोरगोहेन यांनी जारी केलेल्या आदेशानुसार हे फेरबदल करण्यात आले आहेत. या बदलांमुळे जिल्हा प्रशासन आणि प्रमुख विभागांमध्ये नवीन जबाबदाऱ्या वाटप करण्यात आल्या आहेत. काही प्रमुख बदल्या आणि नियुक्त्या: पार्थ प्रतिम मजुमदार, IAS – पूर्वी गृह आणि राजकीय विभाग तसेच महिला व बाल विकास विभागाचे कमिशनर आणि सचिव असलेल्या त्यांची बाजाली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती. मृदुल कुमार दास – बाजालीचे विद्यमान जिल्हाधिकारी असलेल्या त्यांना गृह आणि राजकीय विभाग तसेच महिला व बाल विकास विभागाचे अतिरिक्त सचिव, राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) चे राज्य समन्वयक आणि ई-फॉरेनर्स ट्रिब्यूनल प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अतिरिक्त जबाबदारी. नरेंद्र कुमार शाह, IAS – रोजगार आणि हस्तकला प्रशिक्षण संचालक असलेल्या त्यांची मुख्यमंत्री सचिवालयात सचिव म्हणून नियुक्ती (Assam Industrial Infrastructure Development Corporation चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून अतिरिक्त प्रभार कायम). आदित्य विक्रम यादव, IAS – मुख्यमंत्री सचिवालयातील पूर्वीचे पद सोडून लखीमपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती. प्रणवजीत काकोटी – लखीमपूरचे विद्यमान जिल्हाधिकारी असलेल्या त्यांना कौशल्य, रोजगार आणि उद्योजकता विभागाचे अतिरिक्त सचिव आणि रोजगार व हस्तकला प्रशिक्षण संचालक म्हणून जबाबदारी. या व्यतिरिक्त इतर अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, पश्चिम कार्बी आंगलोंग, दरांग, बक्सा, चिरांग इत्यादी जिल्ह्यांमध्ये नवीन जिल्हाधिकारी नेमले गेले आहेत. हा फेरबदल निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासकीय यंत्रणेला गती देणारा आणि प्रभावी ठरेल, अशी चर्चा राजकीय व प्रशासकीय वर्तुळात आहे.