आसामच्या मुख्यमंत्र्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल

गुवाहाटी – आसाम आणि मिझोराम यांच्यातील संघर्षाचे वातावरण अजून निवळलेले नाही. आज मिझोराम सरकारने आसामचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या राज्यातील काही पोलिस अधिकाऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नांचा आणि त्यासाठी कट रचल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे.
मिझोरामचे पोलिस महानिरीक्षक जॉन नेहालिया यांनी आज ही माहिती दिली. आसामचे पोलिस महानिरीक्षक अनुराग आगरवाल, उपमहानिरीक्षक देवज्योती मुखर्जी, पोलिस अधिक्षक चंद्रकांत निंबाळकर, साहब उद्दीन, किर्ती जल्ली, विभागीय वनअधिकारी सनीदेव चौधरी यांच्यावरही मिझोराम पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
दोन्ही राज्यांच्या सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत आसामचे पाच पोलिस कर्मचारी ठार झाले आहेत. पण हत्येच्या प्रयत्नांचा गुन्हा मात्र मिझोराम पोलिसांनीच दाखल केला आहे. विशेष म्हणजे दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री हे भाजप प्रणित एनडीएचेच मुख्यमंत्री आहेत.





