Himanta Biswa Sarma: चुकीच्या सोशल मिडीया पोस्टमुळे आसामच्या मुख्यमंत्र्यांनी मागितली माफी

गुवाहाटी – आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या सोशल मिडीया खात्यावर भगवद् गीतेचे चुकीचे भाषांतर करणारी पोस्ट प्रसिद्ध झाली होती त्याबद्दल त्यांनी माफी मागितली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आमच्या टीमने भगवत गीतेतील एका श्लोकाचा चुकीचा अर्थ लावून अनुवाद केला आहे. त्यातून ही समस्या उद्भवली होती. या प्रकाराबद्दल आपण माफी मागून ही पोस्ट काढून टाकली आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
सरमा म्हणाले की आपण रोज सकाळी भगवत गीतेचा एक श्र्लोक सोशल मिडीयावर पोस्ट करीत असतो. आत्तापर्यंत आपण असे ६६८ श्र्लोक पोस्ट केले आहेत. अलीकडेच माझ्या टीम सदस्यांपैकी एकाने अध्याय १८ मधील श्लोक ४४ च्या चुकीच्या भाषांतरासह पोस्ट टाकली होती. मला चूक लक्षात येताच मी ती पोस्ट त्वरित हटवली. हटवलेल्या पोस्टमुळे कोणाचे मन दुखावले गेले असेल तर मी मनापासून माफी मागतो असे ते म्हणाले.
या पोस्टवरील ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये असे म्हटले आहे की, शेती, गायपालन आणि व्यापार ही वैश्यांची नैसर्गिक कर्तव्ये आहेत, तर ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य या तीन वर्णांची सेवा करणे हे शूद्रांचे नैसर्गिक कर्तव्य आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सरमा यांनी असेही म्हटले होते की, स्वतः भगवान श्री कृष्णाने वैश्य आणि शूद्रांच्या नैसर्गिक कर्तव्यांचे वर्णन केले आहे. या पोस्टवरून भाजप वर हा पक्ष मनुवादी असल्याची जोरदार टीका सुरू झाली होती. त्यामुळे त्यांनी माफी मागून ही पोस्ट काढून टाकली.





