Pune District : दौंड तालुक्यातील इच्छुकांना आस

राहू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती, नगरपरिषद, महापालिकेच्या निवडणुकांच्या बाबतीत एका सकारात्मक वक्तव्याने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांना एक आस निर्माण झाली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका या साधारणपणे तीन महिन्यांच्या आसपास होण्याचा शक्यता निर्माण होऊ शकते, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याने इच्छुकांचा जीव भांड्यात पडलेला आहे. सर्वोच्च न्यायालयात असलेल्या ओबीसी आरक्षणाचा तिढा लटकलेला आहे. हा प्रश्न न्यायप्रविष्ट असल्याने राजकीय इच्छाशक्ती अभाव दिसून आला आहे.
त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. आता विधानसभेच्या निवडणुका होऊन स्थिर सरकार स्थापन झाले आहे. त्यातही मुख्यमंत्री यांनी पुढील तीन महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात, असे वक्तव्य केल्याने एक वेगळेच वातावरण तयार झाले आहेत. इच्छुक पुन्हा एकदा तयारीला लागले की आहेत.
सरकारने या निवडणुका खरेतर लवकर घेणे गरजेचे होते. प्रशासक असल्यामुळे अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अनेक गरीब लोकांना वैयक्तिक लाभाच्या योजनांपासून लांब राहावे लागत आहे. त्यामुळे लवकर या निवडणुका होणे गरजेचे आहे. अनके होतकरू कार्यकर्त्यांना संधी मिळणे गरजेचे आहे.
– सचिन शिंदे, अध्यक्ष, ओबीसी सेल दौंड, (राष्ट्रवादी शरद पवार गट).
निवडणुकीला विकासकामांच्या माध्यमातून सामोरे जाण्याचा मानस आहे. विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे वरिष्ठांनी संधी दिल्यास निश्चितच या संधीचे सोने करण्याचा प्रयत्न केला जाईल.
– पाटील यादव – माजी सरपंच, पाटेठाण.
आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे केली आहेत. त्यामुळे निवडणूक अवघड जाणार नाहीत. राखीव जागेसंदर्भात आरक्षणाचा विषय मार्गी लागल्यास व पक्षाने संधी दिल्यास निश्चितच प्रयत्न करू.
– हनुमंत बोरावने, माजी अध्यक्ष, पाणवली सोसायटी, संचालक, भीमातीर शिक्षण संस्था, वडगाव बांडे.
खरे तर आता आपल्याबरोबरच्या कार्यकर्त्यांना संधी देण्याची वेळ आहे. अनेक होतकरू कार्यकर्ते तयार होत आहेत. त्यांना संधी देऊन वरिष्ठ सांगतील, त्याप्रमाणे दिलेला उमेदवार निवडून आणण्यासाठी आमच्यासारख्यांनी त्यांना पाठिंबा दिला गेला पाहिजे.
-सुशांत दरेकर, माजी उपसभापती, पंचायत समिती, दौंड.





