Pune District : निवडणुका लांबत चालल्याने इच्छुकांचा हिरमोड

लोणीकंद : लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून इच्छूक उमेदवारांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी काशी-अयोध्ये सह बाळूमामा, कोल्हापूर, अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर आणि तिरुपती बालाजीच्या देवदर्शनचे नियोजन केल्याने इच्छूकांसह या गटाची जिल्हाभर चर्चा रंगली आहे.
प्रमुख एकही पक्षाने उमेदवारी जाहीर केली नसली तरी इच्छुकांमध्ये आपणच उमेदवार असल्याचे गृहीत धरून पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असणार्या लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटात मतदार राजाला खूश करण्यासाठी अमाप खर्च होताना पाहायला मिळत आहे परंतु दुसरीकडे आरक्षणाच्या मुद्द्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबत चालल्याने सध्यातरी श्रेष्ठींना खुश करण्यासाठी व अधिकृत उमेदवारी आपल्यालाच मिळवण्यासाठी इच्छूक खर्च करताना दिसत असले तरी निवडणूक घोषित होत नसल्याने इच्छुकांमध्ये हिरमोड झाल्याचे दिसत आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावर मागील काही दिवसांपासून लांबलेल्या पुणे जिल्हा परिषदेची निवडणुकीची घोषणा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होईल या आशेने लोणीकंद-पेरणे जिल्हा परिषद गटातील इच्छुकांकडून देवदर्शन यात्रेसाठी चढाओढ झाल्याची पाहायला मिळाली. काशी अयोध्येनंतर तिरुपती बालाजी दर्शनाचे देखील नियोजन करण्यात आले. देवदर्शन यात्रा, होम मिनिस्टर कार्यक्रम, यात्रा-जत्रा, गावभेट दौरे, जयंती उत्सव यांना लाखोंच्या वर्गण्या देताना पाहायला मिळाली; परंतु आजअखेर निवडणूक आयोगाकडून कसलीही घोषणा न झाल्याने व झालेल्या नगरपंचायतीच्या मतदानाचा निकाल हा 21 डिसेंबर रोजी असल्याने तोपर्यंत तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रतीक्षाच करावी लागणार असल्याची शक्यता असल्याने इच्छुकांवर मतदारांना खूश करण्या किती करावी, पदरमोड असं म्हणण्याची वेळ आली आहे.





