Baramati News : जबलपूर येथील राष्ट्रीय विद्युत मंडळ स्पर्धेत पैलवान अमोल गवळी यांना सुवर्णपदक !

बारामती : मध्यप्रदेशातील जबलपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ४६ व्या अखिल भारतीय विद्युत क्रीडा स्पर्धा २०२४-२५ मध्ये कुस्ती गटात बारामती येथील महावितरणचे तंत्रज्ञ पैलवान अमोल दिगंबर गवळी यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. अमोल गवळी महावितरणच्या बारामती विभागात तंत्रज्ञ पदावर कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वीही कुस्तीमध्ये अनेक पदके पटकावली आहे.
यावर्षी अखिल भारतीय विद्युत क्रीडा स्पर्धा जबलपूर (मध्यप्रदेश) येथे १५ ते १७ जानेवारी दरम्यान भरविण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत गवळी यांची ९७ किलो वजन गटात हरियाणाच्या मल्ला सोबत अंतिम लढत झाली. अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत गवळी यांनी विजय मिळवला व सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.
त्यांच्या या यशाबद्दल महावितरण बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, अधीक्षक अभियंता दीपक लहामगे, कार्यकारी अभियंता संजय सोनवलकर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे यांचेसह अनेकांनी अभिनंदन केले आहे.





