Asian Games Opening : जपानमध्ये २०२६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेला दणक्यात प्रारंभ! उद्घाटन सोहळ्यात मनू-पवनने फडकवला तिरंगा
Asian Games Opening : जपानचे सम्राट नारुहितो यांनी महारानी मासाको, राजघराण्यातील सदस्य आणि क्रीडा जगतातील दिग्गजांच्या उपस्थितीत या महाकुंभाच्या सुरुवातीची औपचारिक घोषणा केली.

Asian Games 2026 Grand Opening Ceremony In Nagoya Manu Bhaker Pawan Sehrawat Lead India : जपानमधील नागोया येथील मिझुहो पार्क ॲथलेटिक स्टेडियमवर शनिवार, १९ सप्टेंबर रोजी २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धेची (Asian Games 2026) एका भव्य आणि अत्याधुनिक सोहळ्याने शानदार सुरुवात झाली. जपानचे सम्राट नारुहितो यांनी महारानी मासाको, राजघराण्यातील सदस्य आणि क्रीडा जगतातील दिग्गजांच्या उपस्थितीत या महाकुंभाच्या सुरुवातीची औपचारिक घोषणा केली. जवळपास दोन तास चाललेल्या या सोहळ्यात राष्ट्रगीतानंतर जपानच्या सेल्फ डिफेन्स फोर्सच्या जवानांनी राष्ट्रध्वज फडकवला आणि संपूर्ण स्टेडियममध्ये केवळ ध्वजावर प्रकाशझोत टाकून अनोखा नजराणा सादर केला.
४६ पथकांची शानदार परेड; भारताचे मनू भाकर अन् पवन सेहरावतने केले नेतृत्व!
उद्घाटन सोहळ्यात ४५ देश आणि आशियाई ऑलिम्पिक परिषदेच्या (OCA) निर्वासित (Refugee) संघासह एकूण ४६ पथकांनी संचलन केले. अफगाणिस्तानच्या पथकाने संचलनाची सुरुवात केली, तर चीनचे ८०० हून अधिक खेळाडूंचे दल मुख्य आकर्षण ठरले. भारतीय पथकाचे नेतृत्व ऑलिम्पिक पदकविजेती मनू भाकर आणि स्टार कबड्डीपटू पवन सेहरावत यांनी नेव्ही ब्लू पोशाखात तिरंगा फडकवत केले. अधिकृत किट वेळेत न मिळाल्यामुळे तेजिंदरपाल सिंग तूरच्या जागी ऐनवेळी पवन सेहरावतला हा बहुमान देण्यात आला.
महिला क्रिकेट संघ सेमीफायनलमध्ये; टेकबॉलमध्ये कांस्यपदकाची आशा!
HERE IS OUR TEAM INDIA!!!!!!! 🇮🇳🇮🇳🇮🇳
– Pawan Sehrawat and Manu Bhaker lead the Indian contingent at Asian Games 2026!
LET THE MEDAL HUNT BEGIN! 🔥🔥🔥 pic.twitter.com/74WRLtu1kg
— The Khel India (@TheKhelIndia) September 19, 2026
स्पर्धेच्या अधिकृत उद्घाटनापूर्वीच भारताने पदकांच्या दिशेने आगेकूच केली आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने जपानचा ८ गडी राखून धुव्वा उडवत उपांत्य फेरीत धडक मारली आहे. २० सप्टेंबर रोजी भारताचा सामना बांगलादेशविरुद्ध रंगेल. दुसरीकडे, पहिल्यांदाच समाविष्ट झालेल्या टेकबॉल स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर भारताची क्विमसी डिसोझा आता कांस्यपदकासाठी मैदानात उतरणार आहे.
४ ऑक्टोबरपर्यंत रंगणार थरार; ११ हजार खेळाडू ४६९ सुवर्णपदकांसाठी भिडणार!
नागोयातील मिझुहो पार्क स्टेडियमवरच ४ ऑक्टोबर रोजी या क्रीडा स्पर्धेचा सांगता समारंभ पार पडेल. या संपूर्ण स्पर्धेत ४३ वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये ११ हजार खेळाडू ४६९ सुवर्णपदकांसाठी चुरशीची लढत देणार आहेत.





