Asian Games 2023 : अननुभवी भारताची आज चीनशी लढत

हांगझोऊ :- आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या फुटबॉलच्या सामन्यांना आजपासून येथे प्रारंभ होत आहे. भारतीय संघात प्रमुख खेळाडूंचा समावेश नसल्याने तुलनेने अननुभवी संघाचा सामना यजमान चीनशी होणार आहे. क्लब की देश या वादात अनेक खेळाडूंना या स्पर्धेला मुकावे लागणार आहे.
आज होणारे सामने…
फुटबॉल – भारत विरुद्ध चीन (संध्याकाळी 5 वाजल्यापासून)
आयपीएलप्रमाणेच इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेतील अनेक संघांनी आपल्या ताफ्यातील स्टार खेळाडूंना या स्पर्धेसाठी मुक्त करण्यास नकार दिल्यामुळे भारतीय फुटबॉल महासंघाने तुलनेने अननुभवी खेळाडूंचा संघ या स्पर्धेसाठी पाठवला आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा समावेश यजमान चीन, बांगलादेश व मॅनमार यांच्याच गटात करण्यात आला आहे. हा गट भारतीय संघासाठी फारसा कठीण नसला तरीही संघाला मोठ्या खेळाडूंची उणीव भासणार आहे.
संघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी मात्र हा संघदेखील पदक जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. पुरुष गटात भारतीय फुटबॉल संघाने 1951 व 1962 साली सुवर्णपदक पटकावले होते. त्याची यंदा पुनरावृत्ती करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ सोमवारी येथे दाखल झाला व लगेचच संघाचा सलामीचा सामना आज (मंगळवारी) होत आहे.
ही स्पर्धा खरेतर गेल्या वर्षीच आयोजित करण्यात येणार होती, मात्र, चीनमध्ये करोनाचा धोका पुन्हा वाढल्याने ही स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आली. यंदा होत असलेली ही स्पर्धा 15 दिवस चालणार असून भारताने या स्पर्धेसाठी तब्बल 655 खेळाडूंचे पथक पाठवले असून ते विविध क्रीडा प्रकारात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी कडवी लढत देतील. गत स्पर्धेत भारताने 16 सुवर्ण, 23 रजत तर 31 ब्रॉंझ अशी एकूण 70 पदके जिंकली होती.
छेत्रीवरच लक्ष…
भारतीय संघाचे अनेक प्रमुख खेळाडू या स्पर्धेत खेळत नसले तरीही देशाचा स्टार खेळाडू व कर्णधार सुनील छेत्री या स्पर्धेत खेळणार असल्याने भारतीय संघाला विजयाची संधी आहे. छेत्री हा आजवर भारताकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू ठरला असून त्याच्या कामगिरीवरच संघाचे यशापयश अवलंबून राहणार आहे.





