Asian Champions Trophy : महिला हॉकी संघाने चॅम्पियन्स करंडक जिंकला; 4-0 च्या फरकाने जपानवर मात

Asian Champions Trophy – भारताच्या महिला हॉकी संघाने (Women’s hockey team) आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा जिंकली. भारतीय संघाने अंतिम फेरीत बलाढ्य जपानवर 4-0 असा एकहाती विजय मिळवला. या स्पर्धेच्या इतिहासातील भारताचे हे दुसरे विजेतेपद ठरले.
अंतिम सामन्यात भारताच्या संगीता कुमारीने 17 व्या मिनिटाला गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर नेहाने 46 व्या मिनिटाला तर, लालरेमसिआमीने 57 व्या मिनिटाला गोल करत भारताची स्थिती आणखी भक्कम केली.
स्टार खेळाडू वंदना कटारीयाने 60 व्या मिनिटाला गोल केला व संघाची आघाडी 4-0 अशी वाढवली. जपानला या संपूर्ण लढतीत भारताचा बचाव भेदता आला नाही व याच गोलफरकावर भारताने हा सामना जिंकला.
या स्पर्धेच्या विजेतेपदासह सुवर्णपदक मिळवणाऱ्या भारतीय महिला संघाला हॉकी इंडियाने 3 लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. तसेच संघाच्या सपोर्ट स्टाफलाही प्रत्येकी दीड लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. यापूर्वी भारतीय महिला संघाने 2016 साली ही स्पर्धा जिंकली होती.





