Asian Champions Trophy 2024 : उपांत्य फेरीत पाकिस्तानचा लाजिरवाणा पराभव, चीननं उडवला धुव्वा…

Asian Champions Trophy 2024 (Pakistan vs China) : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताकडून झालेल्या दारूण पराभवानंतर पाकिस्तान संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पाकिस्तान संघाचा पराभव झाला आहे. उपांत्य फेरीत चीननं पाकिस्तानचा पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभव करत प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली आहे.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर दोन्ही संघांमध्ये 60 मिनिटे चुरशीची स्पर्धा होती. पण निर्धारित वेळ संपेपर्यंत दोन्ही संघ 1-1 गोल करू शकले आणि त्यानंतर सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला जिथे पाकिस्तानने खराब खेळाच्या सर्व मर्यादा मोडल्या. निर्धारित वेळेत पाकिस्तानकडून नदीम अहमदने, तर चीनकडून लू युआनलिन यांनी गोल केले होते.
पेनल्टी शूटआऊटमध्ये पाकिस्तान संघाला एकही गोल करता आला नाही आणि चीनने पाकिस्तानच्या गोलपोस्टमध्ये दोनदा भेदक मारा केला. चीनच्या संघाने पहिला शॉट घेतला आणि पाकिस्तानने शूटआऊटसाठी आपला गोलकीपर बदलला. संघाने मुनीब उर रहमानला गोलरक्षक बनवले पण असे असतानाही चीनने दोनदा चेंडू गोलपोस्टमध्ये पाठवला. आता पाकिस्तानचा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडला असून त्यांना तिसऱ्या स्थानासाठी सामना खेळावा लागणार आहे.
Full Time
Hero Asian Champions Trophy Moqi China 2024#hact2024#asiahockey pic.twitter.com/7hREFXA1vs— Asian Hockey Federation (@asia_hockey) September 16, 2024
पेनल्टी शूटआऊटमध्ये काय झालं?
पेनल्टी शूटआऊटमध्ये चीनने पहिल्या शॉटमध्ये गोल केला पण पाकिस्तानचा खेळाडू अपयशी ठरला. यानंतर लिन चांगलियांगने दुसऱ्या शॉटमध्ये दुसरा गोल केला. पाकिस्तानचा दुसरा शॉटही चुकला, यावेळी अहमद नदीमने चूक केली. चीनने तिसऱ्या शॉटमध्ये चूक केली पण यानंतर पाकिस्तानचा अब्दुल रहमानही गोल करण्यात अपयशी ठरला आणि अखेरीस पाकिस्तानने सामना गमावला.
भारतानं पटकावलंय 4 वेळा जेतेपद…
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय हॉकी संघाचे वर्चस्व राहिले आहे. 2011 पासून सुरू झालेल्या या स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने आतापर्यंत सर्वाधिक 4 जेतेपदं जिंकली आहेत. भारताने (2011, 2016, 2018, 2023) चार आणि पाकिस्तानने (2012, 2013, 2018) तीन जेतेपद जिंकली आहेत. यामध्ये 2018 मध्ये भारत व पाकिस्तान यांना संयुक्त जेतेपद दिले गेले होते. तर दक्षिण कोरियाने 2021 मध्ये बाजी मारली होती.





