Asian Champions Trophy 2024 : उपांत्य फेरीत भारताचा द. कोरियावर दणदणीत विजय, आता जेतेपदासाठी ‘या’ संघाचं असणार आव्हान…

Asian Champions Trophy 2024 ( India vs South Korea ) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या कांस्यपदक विजेत्या भारतीय हॉकी संघाने आपली उत्कृष्ट कामगिरी कायम ठेवली आहे आणि आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ऑलिम्पिकनंतर पहिली स्पर्धा खेळणाऱ्या टीम इंडियाने सोमवारी, 16 सप्टेंबर रोजी झालेल्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा 4-1 ने दारूण पराभव केला आणि पुन्हा एकदा अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.
भारतीय संघासाठी खेळाडूंनी एकजुटीने कामगिरी केली आणि कोरियन संघ भारतीय संघासमोर टिकू शकला नाही. अशाप्रकारे सध्याची चॅम्पियन टीम इंडिया आपल्या पाचव्या विजेतेपदाच्या जवळ पोहोचली आहे. टीम इंडियाच्या विजयाचा स्टार पुन्हा एकदा कर्णधार हरमनप्रीत सिंग ठरला ज्याने दोन गोल करत संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. आता जेतेपदासाठी टीम इंडियाचा सामना यजमान चीनशी होणार आहे. चीनने पहिल्यांदाच तर भारताने सहाव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे.
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024
अंतिम सामना : भारत वि. चीन
वेळ : 17 सप्टेंबर, दुपारी 3:30 वाजता
ठिकाण : हुलुनबीर
थेट प्रक्षेपण : सोनी स्पोर्ट्स नेटवर्क
चीनमधील हुलुनबीर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत टीम इंडियाने पहिल्या दिवसापासून दमदार कामगिरी केली, जी उपांत्य फेरीपर्यंत कायम राहिली. लीग टप्प्यातील सर्व 5 सामने जिंकल्यानंतर प्रशिक्षक क्रेग फुल्टन यांच्या संघाने सहावा सामनाही सहज जिंकला.
Full Time
Hero Asian Champions Trophy Moqi China 2024#hact2024#asiahockey pic.twitter.com/1bwxnUmq0A— Asian Hockey Federation (@asia_hockey) September 16, 2024
अंतिम फेरीत चीनचं आव्हान…
अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना चीनशी होईल, ज्यांनी पहिल्या उपांत्य फेरीत पाकिस्तानला पेनल्टी शूटआऊटमध्ये पराभूत केले. या उपांत्य फेरीत 60 मिनिटांपर्यंत (निर्धारित वेळेत) स्कोर 1-1 असा बरोबरीत राहिला, त्यानंतर पेनल्टी शूटआऊटद्वारे निर्णय घेण्यात आला. येथे पाकिस्तानी खेळाडूंना एकही गोल करता आला नाही, तर चीनने 2 गोल करत सामना 2-0 असा जिंकून अंतिम फेरीत धडक मारली. हा अंतिम सामना मंगळवार 17 सप्टेंबर रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजता होणार आहे. दोन्ही संघ साखळी टप्प्यातील त्यांच्या पहिल्याच सामन्यात भिडले होते, ज्यामध्ये भारताने 3-0 असा विजय मिळवला होता.
हेड-टू-हेड रेकाॅर्ड
आतापर्यंत दोन्ही संघ एकूण 23 वेळा आमने-सामने आले आहेत. यामध्ये भारताने 17 वेळा बाजी मारली आहे तर तीन वेळा चीनने विजय साकारला आहे. तीन सामने अनिर्णित (Drawn) राहिले आहेत. भारताने या दरम्यान एकूण 79 तर चीनने 24 गोल केले आहेत.
भारतीय संघाचा आक्रमक खेळ…
दक्षिण कोरियाविरुद्धच्या या सामन्यात भारतीय संघाने पहिल्या क्वार्टरपासूनच गोल करायला सुरुवात केली आणि तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत 4-1 अशी आघाडी मिळवली होती. पहिला क्वार्टर संपण्यापूर्वी 13व्या मिनिटाला उत्तम सिंगने टीम इंडियासाठी पहिला गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच दुसऱ्या क्वार्टरमध्ये 2-0 अशी आघाडी झाली. यावेळी सामन्याच्या 19व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीतने पेनल्टी कॉर्नरवरून दमदार शॉट मारून गोल केला.
टीम इंडियाने तिसऱ्या क्वार्टरमध्ये 2 गोल केले. जरमनप्रीत सिंगने 32 व्या मिनिटाला स्कोअर 3-0 असा केला मात्र एका मिनिटानंतर कोरियाला प्रथमच यश मिळाले. त्यांच्यासाठी यांग जिहुनने 33व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला. या क्वार्टरच्या शेवटच्या मिनिटाला हरमनप्रीतने 45 व्या मिनिटाला पुन्हा एकदा गोल नोंदवत विजयावर शिक्कामोर्तब केले. शेवटच्या क्वार्टरमध्ये एकही गोल झाला नाही आणि भारतीय संघाने 4-1 असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.





