#AsiaCup2023 Super-4 #PAKvSL : खेळाडूंच्या दुखापतीचे पाकवर दडपण

कोलंबो :- हॅरीस रौफ व नसीम शाह दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या आशिया करंडक स्पर्धेतील सुपरफोर गटाच्या सामन्यात फलंदाजीला उतरु शकले नाहीत. आता त्यांच्या दुखापतीमुळे पाकिस्तान संघाला मोठा फटका बसला आहे.
त्यांच्या जागी बॅकअप खेळाडू म्हणून पाकिस्तान क्रिकेट मंडळाने शाहनवाझ धानी व झमान खान यांना श्रीलंकेला रवाना केले आहे. मात्र, त्यांना आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याचा अनुभव खूपच कमी असून या स्पर्धेतील पुढील सामन्यांत ते कशी कामगिरी करतात यावरच पाकिस्तान संघाचे यशापयश अवलंबून राहणार आहे.
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनेही खेळाडूंच्या दुखापतींबाबत चिंता व्यक्त केली असून या स्पर्धेनंतर होत असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेपूर्वी रौफ व शाह तंदुरुस्त होणार का? असा प्रश्न त्याने उपस्थित केला आहे.
दरम्यान,आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेत भारताकडून पराभूत झालेले दोन्ही संघ पाकिस्तान व श्रीलंका यांच्यात उद्या(दि.14) होत असलेला सामना अत्यंत निर्णायक ठरणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल व रविवारी त्यांचा विजेतेपदासाठी भारताशी सामना होणार आहे.





