Asia Cup Trophy Controversy : भारतीय संघाने 28 सप्टेंबर 2025 रोजी दुबई येथे झालेल्या आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यात सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव करत विजेतेपद पटकावले होते. मात्र, या विजयाला आता जवळपास एक महिना उलटून गेला तरी भारतीय संघाला अद्याप ट्रॉफी मिळालेली नाही. यामागे एसीसी आणि पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्या कृती कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप होत आहे. विशेष म्हणजे आता एसीसी मुख्यालयातून ट्रॉफी गायब झाल्याची चर्चा आहे. एसीसी मुख्यालयातून ट्रॉफी गायब – बीसीसीआयने मोहसिन नक्वी यांच्या या वादग्रस्त कृतींविरोधात कठोर पवित्रा घेतला असून, हा मुद्दा आयसीसीच्या पुढील महिन्यात होणाऱ्या बैठकीत उपस्थित करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, न्यूज एजन्सी एएनआयच्या हवाल्याने आता धक्कादायक माहिती समोर आली आहे की, मोहसिन नक्वी यांनी आशिया कप ट्रॉफी एसीसी मुख्यालयातून हटवून अबुधाबी येथे अज्ञात ठिकाणी लपवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआयचा एक अधिकारी काही दिवसांपूर्वी एसीसी मुख्यालयात गेला होता. त्याने ट्रॉफीची मागणी केली असता, तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, ट्रॉफी हटवण्यात आली असून ती आता मोहसिन नक्वी यांच्या ताब्यात आहे आणि त्यांनी ती अबुधाबी येथे अज्ञात ठिकाणी ठेवली आहे. नक्वींनी ट्रॉफी देण्यासाठी ठेवली होती अट – या महिन्याच्या सुरुवातीला मोहसिन नक्वी यांनी भारतीय संघाला ट्रॉफी देण्यासाठी एक अट ठेवली होती. त्यांनी सांगितले की, भारतीय संघाने एसीसी मुख्यालयात येऊन त्यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारावी. यापूर्वी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात झालेल्या एसीसीच्या बैठकीत अनेक अहवालांनुसार, नक्वी यांनी अंतिम सामन्यानंतरच्या पुरस्कार सोहळ्यादरम्यान घडलेल्या वादग्रस्त घटनांबद्दल माफी मागितली होती. मात्र, नंतर त्यांनी हे सर्व अहवाल फेटाळून लावले. हेही वाचा – Pakistan Cricket Board : PSL संघाच्या मालकाने PCBची काढली लाज, कायदेशीर नोटीस फाडून दिले चोख प्रत्युत्तर, VIDEO व्हायरल भारतीय संघाचा सुरुवातीपासूनच ठाम पवित्रा – आशिया कप स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने स्पष्ट केले होते की, ते सामन्यांनंतर पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करणार नाहीत. त्याचबरोबर जर विजेतेपद पटकावले तर एसीसी आणि पीसीबी अध्यक्ष असलेल्या मोहसिन नक्वी यांच्या हातून ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. या निर्णयामुळे अंतिम सामन्यानंतरच्या पुरस्कार सोहळ्यात बराच गोंधळ उडाला होता, आणि त्यानंतरही ट्रॉफी भारतीय संघाला मिळालेली नाही. हेही वाचा – IND vs AUS : ‘…फेअरवेल मॅच होती, एक फोटो तरी टाक’, चाहत्यांच्यासमोरच रोहितला काय म्हणाला गंभीर , पाहा VIDEO बीसीसीआयचा कठोर पवित्रा – बीसीसीआयने या प्रकरणात कठोर भूमिका घेतली असून, मोहसिन नकवी यांच्या कृतींमुळे निर्माण झालेल्या वादावर आयसीसीच्या बैठकीत चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघाचा हा विजय आणि त्यानंतरचा ट्रॉफी वाद क्रिकेट विश्वात मोठी चर्चा बनला आहे. मोहसिन नक्वी यांच्या या कृतींमुळे भारत-पाकिस्तान क्रिकेटमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.