Asia Cup 2025 : यूएईच्या विजयाने भारताची सुपर-4 मध्ये धडाकेबाज एंट्री! पाकिस्तानची वाढली धाकधूक, ओमान-हाँगकाँग बाहेर

भारतीय संघाने सुपर-४ फेरीचे तिकीट पक्के –
सोमवारी यूएईने ओमानविरुद्ध 42 धावांनी विजय मिळवल्याने भारताने सुपर-4 चे तिकीट मिळवले. या पराभवामुळे ओमान संघ दोन सामने गमावून सुपर-4 च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ग्रुप ‘ए’ च्या गुणतक्त्यात चार गुणांसह अव्वल स्थानावर आहे. भारताने पहिल्या सामन्यात यूएईला 9 गडी राखून पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 7 गडी राखून मात केली. भारताचा ग्रुप टप्प्यातील शेवटचा सामना 19 सप्टेंबर रोजी अबुधाबीत ओमानविरुद्ध होणार आहे.
पाकिस्तान संघाच्या वाढल्या अडचणी –
ग्रुप ‘ए’ मधील अव्वल दोन संघ सुपर-4 साठी पात्र ठरतील. भारताने एक जागा पक्की केल्यानंतर आता ग्रुप ‘ए’ मधून फक्त एकच संघ पुढच्या फेरीत प्रवेश करेल. यूएई आणि पाकिस्तान यांच्यात 17 सप्टेंबर रोजी दुबईत ग्रुप टप्प्यातील अंतिम सामना होणार आहे. यूएईने हा सामना जिंकल्यास आणि भारताने ओमानविरुद्धचा आपला शेवटचा सामना जिंकल्यास यूएई सुपर-4 मध्ये प्रवेश करू शकते. सध्या यूएई आणि पाकिस्तान यांच्याकडे प्रत्येकी दोन गुण आहेत. जो संघ हा सामना जिंकेल, त्याचे चार गुण होतील. गुणतक्त्यात पाकिस्तान दुसऱ्या, तर यूएई तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र, पाकिस्तानचा नेट रनरेट यूएईपेक्षा सरस आहे.
हेही वाचा – UAE vs OMA : यूएईचा धमाकेदार विजय, ओमानला ४२ धावांनी लोळवलं!
हाँगकाँगचा आशिया कपचा प्रवासही समाप्त –
फक्त ओमानच नाही, तर हाँगकाँगचाही प्रवास संपला आहे. हाँगकाँगने या वर्षीच्या आशिया कपमध्ये आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत आणि दोन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. हाँगकाँगने पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून ९४ धावांनी पराभव पत्करला आणि त्यानंतर बांगलादेशनेही ७ विकेट्सने पराभव केला. आता शेवटच्या सामन्यात हाँगकाँगचा संघ श्रीलंकेकडूनही पराभूत होईल. अशा परिस्थितीत, संघाला कोणताही सामना न जिंकता आशिया कपच्या या हंगामातून बाहेर पडावे लागेल.





