IND vs PAK : हस्तांदोलन न करणे टीम इंडियाला महागात पडणार? ICC चा नियम काय सांगतो? जाणून घ्या

IND vs PAK No Handshake Controversy : आशिया चषक २०२५ च्या लीग फेरीत १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने ७ गडी राखून दमदार विजय मिळवला. मात्र, सामना संपल्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन केले नाही, ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे. बीसीसीआयने कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या या निर्णयाचे समर्थन केले आहे.
भारतीय कर्णधाराचा भावनिक संदेश –
सामन्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने एक भावनिक संदेश दिला. तो म्हणाला, “ही योग्य वेळ आहे आणि मी काही सांगू इच्छितो. आम्ही जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबांसोबत ठामपणे उभे आहोत आणि आमची एकजुटता व्यक्त करतो. हा विजय आम्ही आमच्या सशस्त्र दलांना समर्पित करतो, ज्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले आहे. ते आम्हाला प्रेरणा देत राहोत आणि आम्ही मैदानावर प्रत्येक संधीत त्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करू.”
Well done #TeamIndia 🇮🇳
Well done #SuryakumarYadav 🔥No handshake.. Dedicated win to the families of victims of #PahalgamTerrorAttack .
Also expressed solidarity with #IndianArmedForces 🔥Message is LOUD and CLEAR.. Indian team will stand by its ground without compromising. pic.twitter.com/BrQqc0BV0O
— Lakshya (@IamLakshya_) September 14, 2025
बीसीसीआयचे स्पष्टीकरण –
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना सांगितले, “जर तुम्ही आयसीसीच्या नियमपुस्तिकेचा अभ्यास केला, तर प्रतिस्पर्धी संघाशी हस्तांदोलन करण्याबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश नाहीत. ही एक सौजन्याची परंपरा आहे, कायदेशीर बंधन नाही. ही परंपरा जगभरातील खेळांमध्ये पाळली जाते, पण ती अनिवार्य नाही.”
हेही वाचा – IND vs PAK : कर्णधार सूर्याने ठोकला विजयी षटकार! भारताने पाकिस्तानचा ७ विकेट्सनी पाडला फडशा
आयसीसीचे नियम काय सांगतात?
सामन्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करतात, ही एक जुनी परंपरा आहे, जी खेळभावना आणि परस्पर आदराचे प्रतीक मानली जाते. मात्र, आयसीसीच्या नियमांनुसार हस्तांदोलन करणे बंधनकारक नाही. आयसीसीच्या आचारसंहितेच्या (Code of Conduct) कलम २.१.८ नुसार, जर एखाद्या खेळाडूने खेळभावनेला ठेच पोहोचवणारे कृत्य केले, तर त्याच्यावर कारवाई होऊ शकते.
ही कारवाई दोन स्तरांवर असते:
स्तर १ अपराध: यात खेळाडूला चेतावणी दिली जाऊ शकते किंवा २००० डॉलरपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो.
स्तर २ अपराध: यात खेळाडूची १००% सामना फी कापली जाऊ शकते आणि डिमेरिट पॉइंट्सही दिले जाऊ शकतात.





