IND vs PAK : दुबईत पाकिस्तानचा अपमान? राष्ट्रगीताऐवजी ‘जलेबी बेबी’ आयटम सॉन्ग वाजल्याने खेळाडू स्तब्ध, पाहा VIDEO

IND vs PAK Pakistan Team Anthem Blunder Video Viral : आशिया कप २०२५ चा हाय-व्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळला जात आहे. दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात पाकिस्तानने ९ गडी गमावून भारताला १२८ धावांचे लक्ष्य दिले आहे. दरम्यान सामना सुरु होण्यापूर्वी एक मजेशीर घटना घडली. पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजवण्यापूर्वी एक वेगळे आयटम सॉन्ग वाजवण्यात आले.
पाकिस्तानी राष्ट्रगीतापूर्वी वाजवले आयटम सॉन्ग –
क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा जेव्हा दोन संघांमध्ये सामना असतो तेव्हा दोन्ही देशांचे राष्ट्रगीत वाजवले जाते. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात प्रथम पाकिस्तानचे राष्ट्रगीत वाजवायचे होते. त्यानंतर भारताचे. पण जेव्हा पाकिस्तानी राष्ट्रगीत वाजवण्याची पाळी आली, तेव्हा त्याआधी ‘जलेबी बेबी’ आयटम सॉन्ग वाजवले गेले. हे गाणे सुमारे चार सेकंद वाजले. त्यानंतर गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यानंतर लगेचच ही चूक दुरुस्त करण्यात आली आणि पाकिस्तानचे योग्य राष्ट्रगीत वाजवण्यात आले. या घटनेचा चुकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.
ही घटना २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही घडली होती
DJ played Jalebi Baby song on Pakistan National anthem 🤣#INDvsPAK #BoycottINDvPAK pic.twitter.com/rJBmfvqedI
— 𝗩 𝗔 𝗥 𝗗 𝗛 𝗔 𝗡 (@ImHvardhan21) September 14, 2025
विशेष म्हणजे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष सध्या पीसीबीचे अध्यक्ष मोहसिन नक्वी आहेत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रगीताचा हा मोठा अपमान त्यांच्या देखरेखीखाली घडला आहे. यापूर्वी २०२५ मध्ये पाकिस्तानमध्येच खेळल्या गेलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान अशीच एक घटना घडली होती. त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघांमध्ये खेळल्या जाणाऱ्या सामन्यापूर्वी अचानक मैदानावर ऑस्ट्रेलियन संघाच्या राष्ट्रगीताऐवजी भारतीय राष्ट्रगीत वाजले.
हेही वाचा – IND vs PAK : हार्दिक पंड्याची कमाल! पाकिस्तानविरुद्ध ‘हा’ ऐतिहासिक पराक्रम करणारा ठरला पहिलाच खेळाडू
आश्चर्यकारक गोष्ट अशी होती की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळणाऱ्या संघांमध्ये भारतीय संघाचा समावेश होता, परंतु भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाऊन खेळण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यानंतर पीसीबीने या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली आणि आयसीसीकडे तक्रार केली आणि उत्तर मागितले. पुन्हा एकदा अशीच एक घटना पाहायला मिळाली आहे, जरी फरक असा आहे की पाकिस्तानी संघाच्या राष्ट्रगीताऐवजी स्टेडियममध्ये एक चित्रपटगीत वाजवताना ऐकू आले, ज्यामुळे पाकिस्तानी खेळाडू खूप अस्वस्थ असल्याचे दिसून आले.





