Asia Cup 2025: ‘भारत-पाकिस्तान सामना पाहू नका…’, पहलगाम दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या महिलेचा संताप अनावर

Asia Cup 2025: एशिया कप 2025 मध्ये उद्या, 14 सप्टेंबर रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्यावरून देशभरात नाराजी पसरली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जनतेत पाकिस्तानविरोधात तीव्र संताप आहे. या हल्ल्यात आपला पती गमावलेल्या ऐशन्या द्विवेदी या महिलेने सामना पाहू नये, अशी भावनिक आवाहन जनतेला केले आहे.
पहलगाम हल्ल्यातील दु:खद आठवणी –
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता, यामध्ये कानपूर येथील शुभम द्विवेदी यांचाही समावेश होता. शुभम आपली पत्नी ऐशन्यासह पहलगामला फिरण्यासाठी गेले होते. या हल्ल्याने ऐशन्याच्या आयुष्याला कायमची कलाटणी मिळाली. त्या म्हणाल्या, “हा सामना पाहण्यासाठी कोणीही स्टेडियमवर जाऊ नये किंवा टीव्हीवरही तो पाहू नये. मला समजत नाही की लोक अजूनही हा सामना का पाहत आहेत.”
बीसीसीआयवर टीका –
ऐशन्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर (बीसीसीआय) जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या, “बीसीसीआयने हा सामना खेळण्यास मान्यता द्यायला नको होती. पहलगाम हल्ल्यातील 26 कुटुंबांचे आणि ऑपरेशन सिंदूरमधील शहीदांचे दुखः त्यांना जाणवत नाही का? बीसीसीआयला या कुटुंबांबद्दल कोणतीही संवेदनशीलता नाही.”
#WATCH | Kanpur, UP: On upcoming India vs Pakistan match in Asia Cup 2025, Aishanya Dwivedi – wife of Pahalgam terror attack victim Shubham Dwivedi, says, “BCCI should not have accepted a match between India and Pakistan…I think BCCI is not sentimental towards those 26… pic.twitter.com/1tAu9wjqSo
— ANI (@ANI) September 13, 2025
क्रिकेटपटूंवरही प्रश्नचिन्ह –
ऐशन्याने क्रिकेटपटूंवरही प्रश्न उपस्थित केले. त्या म्हणाल्या, “आमचे क्रिकेटपटू काय करत आहेत? एक-दोन खेळाडूंखेरीज कोणीही पुढे येऊन पाकिस्तानविरुद्ध सामन्याचा बहिष्कार करावा, असे सांगितले नाही. क्रिकेटपटूंना राष्ट्रवादी म्हणतात, पण बीसीसीआय त्यांना बंदुकीच्या टोकावर खेळायला भाग पाडू शकत नाही. त्यांनी देशासाठी उभे राहायला हवे, पण ते तसे करत नाहीत.”
सोशल मीडियावरही बहिष्काराची मागणी –
सोशल मीडियावरही या सामन्याच्या बहिष्काराची मागणी जोर धरत आहे. अनेक नेटकऱ्यांनी सामना न खेळण्याची मागणी केली आहे. तरीही हा सामना नियोजित वेळेनुसार होणार आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा सामना खेळवण्याचा निर्णय अनेकांना अस्वस्थ करणारा ठरला आहे.





