BCCI on Mohsin Naqvi : आशिया कप 2025 चा अंतिम सामना दुबईच्या मैदानावर खेळला गेला, ज्यामध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विजेतेपद पटकावले. मात्र, विजेतेपद मिळवूनही भारतीय संघाला अद्याप ट्रॉफी प्रदान करण्यात आलेली नाही. आशियाई क्रिकेट परिषदेचे (एसीसी) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ट्रॉफी देण्यास नकार दिल्याने हा वाद निर्माण झाला आहे. यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मोहसिन नकवी यांच्याविरुद्ध कठोर कारवाईची योजना आखली आहे. बीसीसीआयची नक्वींवर बंदीची मागणी – समाचार एजन्सी पीटीआयच्या वृत्तानुसार, बीसीसीआय मोहसिन नक्वी यांच्यावर निष्कासनाची कारवाई आणि त्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) संचालक पदावरून हटवण्याची मागणी करणार आहे. बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले की, “आशिया कपची ट्रॉफी ही नकवी यांची वैयक्तिक मालमत्ता नाही आणि त्यांनी ती तातडीने भारतीय संघाला परत करावी.” बीसीसीआय या स्पर्धेचे अधिकृत यजमान असताना नक्वी यांना ट्रॉफी न देण्याचा कोणताही अधिकार नाही, असेही त्यांनी नमूद केले. भारताचा पाकिस्तानवर सलग तिसरा विजय – सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आशिया कप 2025 मध्ये अजेय कामगिरी केली. या स्पर्धेत त्यांनी गट फेरीपासून अंतिम सामन्यापर्यंत पाकिस्तान संघाचा तीन वेळा सामना केला आणि सलग तिन्ही सामन्यांत त्यांना पराभूत केले. अंतिम सामन्यात भारताने 5 गडी राखून विजय मिळवला. तरीही, विजेतेपद मिळवूनही भारतीय संघाला ट्रॉफीशिवाय मायदेशी परतावे लागले. सामन्यानंतरचा पुरस्कार सोहळा सुमारे एक तास उशिराने सुरू झाला आणि तो वेळेआधीच संपवण्यात आला. भारतीय संघाने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, ते मोहसिन नक्वी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार नाहीत. हेही वाचा – IND vs WI : दिल्लीत यशस्वीचा जलवा, संयमी फलंदाजीने शतक ठोकत विराटच्या खास विक्रमाला दिली टक्कर! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निर्माण होणार तणाव – या वादाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने मोहसिन नक्वी यांच्याविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. क्रिकेटप्रेमींमध्येही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. येत्या काही दिवसांत बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यातील चर्चा आणि या प्रकरणाचा निकाल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.