IND U19 vs UAE U19 : वैभव सूर्यवंशीच्या शतकाने उडवला यूएईचा धुव्वा! टीम इंडियाची २३४ धावांनी विजयी सलामी

वैभवने ५६ चेंडूत पूर्ण केले विक्रमी शतक –
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताला चांगली सुरुवात मिळाली नाही. सलामीवीर अयुष म्हात्रे तिसऱ्याच षटकात युग शर्माच्या चेंडूवर यष्टिरक्षक सालेह अमीनकडे झेल देऊन बाद झाला. त्यानंतर दुसरा सलामीवीर वैभव सूर्यवंशीने आक्रमक फटकेबाजी करत आरोन जॉर्जसोबत तिसऱ्या गड्यासाठी २१२ धावांची भागीदारी रचली. ७३ चेंडूत ६९ धावांची संयमी खेळी करून आरोन जॉर्ज बाद झाला. दरम्यान वैभवने ५६ चेंडूत आपले विक्रमी शतक पूर्ण केले. तिसऱ्या गड्यासाठी वैभवने विहान मल्होत्रासोबत ३४ चेंडूत ४७ धावांची भागीदारी रचली.
विहान-वेदांतची ८८ धावांची भागीदारी –
वैभवने मैदानात चौफेर फटकेबाजी करत अमिरातीच्या गोलंदाजांना हैराण करून सोडले. अवघ्या ९५ चेंडूत विक्रमी १४ षटकार आणि ९ चौकारांसह १७१ धावांची खेळी साकारली. भारताला ३०० धावांचा टप्पा गाठून देऊन वैभव बाद झाल्यावर विहान मल्होत्राने व वेदांत त्रिवेदीने आपले अर्धशतक पूर्ण करत ८८ धावांची भागीदारी रचली. त्यानंतर वेदांत त्रिवेदी (३८), अभिज्ञान कुंडू (३२), कनिष्क चौहान (२८) यांनी छोट्याखानी खेळी करत भारताचा डाव ४०० धावांच्या पुढे नेला. भारताने निर्धारित ५० षटकांत ६ गडी गमावून ४३३ धावा उभारल्या. अमिरातीच्या संघाकडून युग शर्मा आणि उद्दीश सुरी यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
हेहा वाचा – Ashish Nehra : ‘पर्याय हवेत तर वॉशिंग्टन सुंदरलाही सलामीला पाठवा…!’, गिलच्या फॉर्मवरून भडकले कोच नेहरा
भारताने समोर ठेवलेल्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या अमिरात संघाची सुरुवात मात्र निराशाजनक झाली. तिसऱ्याच षटकात सलामीवीर शालोम डिसूझा ४ धावा करून बाद झाला. त्याच्या पुढच्याच षटकात दुसरा सलामीवीर आणि कर्णधार यायिन राय सुद्धा १७ धावा करून माघारी परतला. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी अयान मिसबाह, मुहम्मद रायन खान, अहमद खुदादाद, नूरउल्ला अयोबी यांना झटपट बाद केले, त्यामुळे अमिरातीच्या संघाची अवस्था १३.४ षटकांत ६ बाद ५३ अशी झाली होती.
हेही वाचा – RCB : आरसीबीच्या चाहत्यांसाठी IPL 2026 पूर्वी मोठी बातमी! होम ग्राऊंड पुणे असणार की बंगळुरु? झालं स्पष्ट
उद्दीश सुरीने भारतीय गोलंदाजांना फोडला घाम –
अमिरातीचा डाव १०० धावांच्या आत आटोपला जाईल असे वाटत होते, मात्र ८ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या उद्दीश सुरीने पृथ्वी मधुसोबत १४४ चेंडूत ८५ धावांची भागीदारी रचली. अर्धशतक झळकावून पृथ्वी मधु (५०) बाद झाल्यावर उद्दीशने सालेह अमीनसोबत ६१ धावांची भागीदारी करत ५० षटके खेळून काढली. उद्दीशने १०६ चेंडूत नाबाद ७८ धावांची संयमी खेळी केली. अमिरातीचा डाव निर्धारित ५० षटकांत ७ बाद १९० धावांवर मर्यादित राहिला. भारताकडून दीपेश देवेंद्रनने २ तर किशन कुमार सिंग, हेनिल पटेल, खिलन पटेल आणि विहान मल्होत्राने प्रत्येकी १ गडी बाद केला.





