Asia Cup 2022 : आशिया करंडकात ‘दीपक चहर’ ठरेल निर्णायक

मुंबई – आशिया करंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या संघात सुमार कामगिरीनंतरही आवेश खानची निवड झाली. त्यावरून सध्या बीसीसीआय व निवड समितीवर प्रचंड टीका होत आहे. त्यामुळे या संघात आता एक बदल होण्याची शक्यता असून दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरलेला अष्टपैलु दीपक चहर पुनरागमन करण्यासाठी सज्ज बनला आहे.
आशिया करंडक स्पर्धेला येत्या 27 ऑगस्टपासून सुरुवात होतअसून त्यासाठी निवडलेल्या भारतीय संघातून प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह व नवोदित वेगवान गोलंदाज हर्षल पटेल यांना दुखापतीमुळे स्थान देण्यात आले नव्हते. त्यांच्या जागी आवेश खानला संधी देण्यात आली होती. मात्र, त्याची कामगिरी पारशी चमकदार नसताही त्याचा समावेश कसा करण्यात आला अशी विचारणा होत असून त्यावरून खूप टीका सुरु झाली. त्यामुळे अखेर बीसीसीआय व निवड समितीने चहरचा समावेश करण्याचे जवळपास निश्चित केले असून त्याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.
या स्पर्धेसाठी चहरला संघात स्थान मिळू शकते. दुखापतीमुळे तो गेले तब्बल 6 महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. आता त्याला झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघात स्थान मिळाले असल्यामुळे त्याला आशिया करंडकातही संधी मिळेल असे संकेत मिळत आहेत.
चहर आता पूर्ण तंदुरुस्त असून आवेश खानच्या जागी त्याची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. त्याची गोलंदाजी व फलंदाजीची क्षमता सर्वोत्तम असून यापूर्वीही त्याने हे सिद्ध केले आहे. त्याच्यासारखा अष्टपैलु खेळाडू संघात असेल तर भारतीय संघाची फलंदाजी जवळपास आठव्या क्रमांकावपर्यंत भक्कम होणार आहे.
आयपीएल स्टार्सला निकषानूसार संधी
आयपीएल स्पर्धेत सरस कामगिरी केली म्हणून त्या खेळाडूंना सातत्याने संधी देणे योग्य नसून त्यांचे कामगिरीतील सातत्य पाहूनच व तसेच संघातील निवडीचे जे निकष आहेत, त्याचा विचार करुनच स्थान दिले जावे, असे मत बीसीसीआयमधील एका वरिष्ठ सदस्याने व्यक्त केले आहे. केवळ आयपीएल स्पर्धेतील कामगिरी हा निकष नसावा, तर त्याने अन्य महत्वाच्या देशांतर्गत स्पर्धांमध्ये कशी कामगिरी केली आहे व त्यात सातत्य आहे का ते पाहूनच खेळाडूंचा संघ निवडीदरम्यान विचार केला जावा असेही या सदस्याने म्हटले आहे.





