Asian Champions Trophy 2023 : यजमान भारताची आज चीनशी सलामी

चेन्नई :- चीनमध्ये सप्टेंबर व ऑक्टोबर या कालावधीत होत असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी आजपासून येथे सुरू होत असलेली आशिया चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धा एकप्रकारे रंगित तालिमच ठरणार आहे. या स्पर्धेत यजमान भारतीय संघाचा सलामीचा सामना चीनशी आज (गुरुवार) होत आहे.
या स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने तीनवेळा विजेतेपद पटकावले आहे. यंदाच्या स्पर्धेतही आशिया खंडातील विविध प्रबळ देशांविरुद्ध खेळत आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेची तयारी करण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे.
2011 सालानंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा भारतात होत आहे. या स्पर्धेत विजेतेपद मिळवले व त्यानंतरच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही पात्रता निकष पूर्ण केले तर भारतीय पुरुष हॉकी संघाला आगामी पॅरिस ऑलिम्पिकची पात्रताही मिळणार आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धेपूर्वी या स्पर्धेत आपली बलस्थाने व कमकुवत दुवे हेरून त्यात सुधारणा करण्याचे काम भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंगसह सर्वच खेळाडूंना करावे लागणार आहे.
विश्वकरंडक हॉकी स्पर्धेनंतर भारतीय संघ यंदाच्या मोसमात हीच मोठी स्पर्धा खेळत आहे. कर्णधार हरमनच्या नेतृत्वात या कालावधीत भारताने 16 सामने खेळले व त्यात 9 विजय मिळवले, 5 पराभव पत्करले तर दोन सामने अनिर्णित राखले आहेत. चीनचा संघ यंदाच्या मोसमातील पहिलीच मोठी स्पर्धा खेळत आहे. त्यांना गेल्या विश्वकरंडक स्पर्धेत पात्रता मिळालेली नव्हती, त्यामुळे त्यांच्यासाठीही ही स्पर्धा महत्वाची आहे.
कॉर्नरचा लाभ घेण्यात यश मिळावे…
भारतीय संघाचा बचाव चांगला आहे. आक्रमकणही सुरेख आहे मात्र, त्यांना अद्याप मिळालेल्या कॉर्नरचे गोलमध्ये रुपांतर करणे शक्य होत नसल्याचेच अनेक स्पर्धांमध्ये दिसून आले आहे. या स्पर्धेत त्यांना याचाही सराव करायचा आहे व त्यासाठी कर्णधार हरमनसह वरुण कुमार, अमित रोहिदास व जुगराज सिंग यांना याबाबत सरावात मेहनत घ्यावी लागणार आहे.
पाकचा संघही दाखल..
या स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात दाखल झाला असून त्यांचा सलामीचा सामना मलेशियाशी होणार आहे. या स्पर्धेत या सर्व लढतींपेक्षा सर्वांच्याच नजरा भारत व पाकिस्तान यांच्यात येत्या 9 ऑगस्टला होत असलेल्या सामन्यावर लागल्या आहेत.






