लाखणगाव, (वार्ताहर) – बेल्हा-जेजुरी महामार्ग व ओझर-रांजणगाव अष्टविनायक महामार्ग हे दोन्ही महामार्ग पोंदेवाडी (ता. आंबेगाव) येथील रोडेवाडी फाटा चौकात एकमेकांना छेदतात. रोडेवाडी फाटा चौकात पावसाचे पाणी साचत असल्याने परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. पाण्याचा निचरा होईल, अशी व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांनी दिला. आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पोंदेवाडी या गावातून बेल्हा-जेजुरी हा राज्यमार्ग जातो. मागील काही वर्षात नवीन महामार्ग मंजूर होऊन या ठिकाणचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणावर वाहतूक होत असते. महामार्ग पोंदेवाडी गावातून जातो. तर ओझर रांजणगाव अष्टविनायक महामार्ग पोंदेवाडी गावातून जातो. दोन्ही महामार्ग रोडेवाडी फाटा या ठिकाणी एकमेकांना छेदतात. त्यामुळे या ठिकाणी वाहनांची वर्दळ असते. या ठिकाणच्या चौकामध्ये अनेक नवीन व्यवसाय उभे राहिले असून अनेक स्थानिक लोकांना या ठिकाणी रोजगार मिळाला आहे; परंतु हे दोन्ही रस्ते होत असताना पावसाचे पडणारे पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होईल, अशी कोणतीच व्यवस्था संबंधित ठेकेदारांनी केलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी पावसाचे पाणी साचते. या साचलेल्या पाण्यामुळे वाहनचालक त्याचप्रमाणे स्थानिक दुकानदार, रहिवाशांना त्रास होतो. रस्त्या शेजारील डबक्यात साचलेल्या पाण्यामुळे मच्छर वाढले असून अनेक आजारांना त्यामुळे निमंत्रण मिळत आहे. संबंधीत ठेकेदाराने रस्ता करत असताना या पाण्याची व्यवस्था करणे गरजेचे होते; परंतु ते केले नाही, त्यामुळे हा त्रास येथील नागरिकांना होत आहे. त्यामुळे या ठिकाणी पाण्याचा योग्य निचरा होईल, अशी व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल. – सतीश घोलप, ग्रामस्थ